सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मागितला; उद्या भरणार उमेदवारी
![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही नेत्यांत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप समोर आली नाही. पण त्यांच्यात बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावर चर्चा झाली असावी असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, काँग्रेसने यापूर्वीच बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण आता सुनेत्रा पवारांनी स्वतः सपकाळ यांना फोन केल्यामुळे काँग्रेस कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी येत्या 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे स्वतः सुनेत्रा पवार या मतदारसंघातून मैदानात उतरल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. हे दोन्ही पक्ष अजित पवारांना आदरांजली म्हणून या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नाहीत. पण काँग्रेसने मात्र या निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. सुनेत्रा पवार व हर्षवर्धन सपकाळ यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण सूत्रांनी या दोन्ही नेत्यांत बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याचा दावा केला आहे. परिणामी, काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याच्या आपल्या भूमिकेवर पुन्हा एकदा फेरविचार करण्याची शक्यता वाढली आहे. महादेव जानकरांशीही फोनवरुन चर्चा सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांनी शनिवारीच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांचा पाठिंबा मागितला होता. त्याला ठाकरेंनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवारांना 19 उमेदवारांचे आव्हान बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारांची एक मोठी फळी उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे. यात हिंदुस्तान जनता पार्टीचे सतिश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घटुकडे, राष्ट्रीय किसान बहूजन पार्टीचे अरूण निटुरे यांच्यासह सागर भिसे, गजानन गवळी, त्रिशाला कांबळे, दिलीप अळोणी, दत्तात्रेय बेदरे, मिथून आटोळे, रजाक मुलाणी, संदीप खरात, विलास होळकर, अभिजीत बिचुकले, अनिल तुपे, संकेत गावडे, दादा थोरात आणि अभिजीत कांबळे असे अनेक अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीतील ही लढत बहुरंगी होणार असून मतदारांसमोर अनेक पर्याय उभे राहिल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
