साधुग्रामसाठी झाडे तोडणे कोणत्या संस्कृती बसते?:वकील असीम सरोदेंचे सरकारला खुले पत्र; देशावर प्रेम करण्याचा उपरोधिक सल्ला

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-07t13_1775548507.png




वकील असीम सरोदे यांनी नाशिक कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या अमाप वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पर्यावरणस्नेही व निसर्गासोबत जीवन जगणे ही मानवी व सनातन धर्माची संस्कृती आहे. त्यामुळे साधूग्राम बांधण्यासाठी वाढलेले वृक्ष तोडण्याची योजना कोणत्या संस्कृती बसते? असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सरकारला देशावर प्रेम करून पाहण्याचा उपरोधिक सल्लाही दिला. नाशिक येथे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. यात साधूग्राम तयार करण्यासाठी तपोवनातील वृक्षतोड केली जात आहे. या प्रकरणी सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी सरकारला खुले पत्र लिहून नाहक वृक्षतोड टाळण्याचा सल्ला दिला आहे. खाली वाचा असीम सरोदेंचे पत्र जशास तसे… असीम सरोदे आपल्या पत्रात म्हणतात, कुंभमेळ्यासाठी वृक्षवल्ली कापण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थगिती. मागील वेळी सुद्धा स्थगिती दिली होती पण कायद्याची प्रक्रिया न करता झाडे कापू नयेत असे म्हटल्याचा गैरफायदा तुम्ही घेतला आणि कागदोपत्री बोगस, दिखाऊ प्रक्रिया करून मोठ्ठाली वृक्ष जमिनीवर लोळवलीत. यावेळी मात्र स्पष्ट स्थगिती आहे कि पुढील तारखेपर्यंत झाडांना तोडायचे नाही. साधुग्राम बांधण्यासाठी वाढलेले वृक्ष तोडण्याची योजना कोणत्या संस्कृतीत बसते? पर्यावरणस्नेही व निसर्गासोबत जीवन जगणे ही आहे मानवी संस्कृती आणि सनातन धर्मसुद्धा. तुम्हाला वाढलेल्या वृक्षांपेक्षा महत्वाचा कुंभमेळा वाटतो? मग घ्या ना कुंभमेळा पण त्यासाठी वृक्षराजी आणि पर्यावरणावर करवती का चालविता? तुम्हाला लागलेला भव्यतेचा ‘नाद’ मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रकोप घडवेल. साहेब, तुम्हीच कट्टर हिंदुत्ववादी असे तुमच्या मनात नेहमी असते आणि आता तर तुम्ही योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांच्यापेक्षा जास्त कट्टर हिंदुत्ववादी अशी स्वयंघोषित स्पर्धा सुरु केलीय, त्या राजकीय कारणांसाठी तुम्हाला नाशिकचा कुंभमेळा भव्य करायचा आहे बस्स. कृपया बंद करा हे विघातक राजकारण. माणसांनी राजकारणासाठी भांडणे, एकमेकांना संपविणे आम्ही खूप बघितले लोकल चाणक्य साहेब. तुमचे राजकारणाचे व पैशांचे हिशोब, निसर्ग- पर्यावरणापासून दूर ठेवा इतकीच नम्र विनंती. निसर्ग, पर्यावरण काहीच म्हणणार नाही, बोलणार नाही, विरोध करणार नाही पण जेव्हा निसर्ग निषेध करेल तेव्हा मानवी जमात होरपळून निघेल, कचऱ्यासारखी पाण्यात वाहून जाईल किंवा थंडीने रक्त गोठून मरेल आणि तेव्हा तुम्ही, अभिजन-महाजन, साधू-महंत, फादर-मौलवी कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे सत्ता असण्याची अकड कमीच करा. जनतेचा पैसा खर्च करण्याची प्राथमिकता व प्राधान्यक्रम तुम्ही चुकविताय साहेब. देशावर या भारतभू वर प्रेम करणे सोप्पे नाही. येथील निसर्ग व पर्यावरणाचे मारेकरी म्हणजे देशाचे गद्दारच. बघा ना देशावर प्रेम करून. प्रयत्न केला तर जमेल, असे असीम सरोदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. अशोक खरात विशेष सरकारी वकील होण्याचा प्रस्ताव उल्लेखनीय बाब म्हणजे असीम सरोदे यांनी नाशिकच्याच भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील होण्याचीही तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले होते, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यासाठी कुणी मिळत नाहीये ही बातमी वाचली. आमचे मित्र अजय मिसार सरकारतर्फे महाराष्ट्रातील अनेक केसेसमध्ये व्यस्त असल्याने असेल कदाचित त्यांनी खरात केसमध्ये सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. ‘वैसे तो मै बहोत प्रभावित हु आपसे’ फेम एकमेव विशेष म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेले महोदय दिल्ली सभेत जाऊन बसले. पण तरीही मीच विशेष सरकारी वकील म्हणून केसेस चालविणार असा त्यांचा हट्ट असतो. त्यांना सरकारने विचारून बघावे. ते कायदा व फायदा दोन्ही बाजूंनी विचार करू शकतात. खरात सारख्या भोंदू बाबालाच नाही तर अश्या प्रवृत्ती नेस्तनाबूत करायच्या असतील तर खरात विरोधातील या केसमध्ये ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. पण विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे राजकारण आहे. ‘ यात राजकारण आणू नका’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मनात जे राजकारण असेल त्यालाच ‘राज्याचे धोरण’ म्हणण्याचा प्रघात आहे, असे ते म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *