छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर मोफत हवेचा केवळ देखावा सुरू असल्याचे चित्र असून, पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना आवर्जून सेवा देणाऱ्या पेट्रोल पंपांवर टायरमध्ये मोफत हवा भरण्याची वेळ आली की मात्र ग्राहकांची घोर निराशा आणि गैरसोय होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड या ६० किलोमीटरच्या महामार्गावरील १८ पेट्रोल पंपांची पाहणी केली असता, केवळ तीन ठिकाणीच मोफत हवा उपलब्ध असल्याचे आढळले. तर उर्वरित १५ पंपांवर ग्राहकांना ही सुविधा मिळालीच नाही. अनेक ठिकाणी हवा भरण्याची नळी केवळ लटकवून ठेवलेली दिसते; मात्र प्रत्यक्षात कॉम्प्रेसर यंत्रणा बंद असणे किंवा कर्मचारी उपलब्ध नसणे, अशा कारणांमुळे सुविधा ठप्प आहे. महामार्गावरून दुचाकी, चारचाकी, प्रवासी आणि मालवाहू वाहनांची सतत ये-जा असते. लांबच्या प्रवासात सुरक्षेच्या दृष्टीने टायरमधील हवेचा योग्य दाब राखणे अत्यंत गरजेचे असते. हवा कमी असल्यास अपघात घडण्याची किंवा टायरची झीज वाढण्याची शक्यता असते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइन्सनुसार आणि भारत पेट्रोलियमच्या संदर्भातील केंद्रीय माहिती आयोगाच्या २०२६ मधील निर्णयानुसार, कार्यरत वेळेत ग्राहकांना मोफत सामान्य हवा उपलब्ध करून देणे ही डीलरची कायदेशीर जबाबदारी आहे. सर्व पेट्रोल पंपांवर तपासणी करणार ः पुरवठा निरीक्षक सिल्लोड ते संभाजीनगर दरम्यानच्या सर्व पेट्रोल पंपांवर शासनाचे फायर फायटिंग साहित्य, आवश्यक माहिती फलक आणि मोफत हवा या सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याची पुढील आठवड्यात प्रत्यक्ष चौकशी केली जाईल. ज्या ठिकाणी या सुविधा मिळत नसतील, त्या पंपांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पुरवठा निरीक्षक बळीराम मुंढे यांनी सांगितले. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation कुत्रे भुंकल्याने पळाली:गरम दूध अंगावर पडून 3 वर्षीय मुलीचा मृत्यू, बीडमधील घटना