भारतीय गुरुकुल परंपरा शिकण्यासाठी सालबर्डी येथे १५० शिबिरार्थींचा सहभाग:सालबर्डी येथील संत मारोती महाराज देवस्थानाद्वारे शिबिराचे आयोजन‎

0
240_17784057506a005176ab7ea_morshivaktima.jpg




सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र सालबर्डी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मारुती महाराज देवस्थान येथे बालसंस्कार व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा डॉ.नलिनी कुर्वे यांच्या हस्ते केले. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव विजय भाकरे, उपाध्यक्ष रामदास गोटे, कोषाध्यक्ष दादा बरघट, विश्वस्त अनिल सोमदे, डीगांबर ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद पराळे, चेतन काळमेंघ आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात ८ ते १५ वयोगटातील अमरावती, वर्धा, नागपूर, मध्यप्रदेश येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांची नोंदणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे संचालक भागवताचार्य मनोज महाराज सातंगे यांनी केले. यावेळी नामदेव महाराज जाणे, नलिनी कुर्वे यांनी विचार व्यक्त केले. २० मे पर्यंत सुरू असलेल्या या शिबिरादरम्यान योगासन, प्राणायाम, गीतापाठ, आध्यात्मिक प्रश्न उत्तरे, संस्कृत याचे अध्ययन केले जात आहे. दुपारचे सत्रात श्रीमद्भागवत गीत गायन, मृदुंग वादन, हरिपाठ, पावल्या भारुड, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती जागरण, पर्यावरण संरक्षण, देशधर्म, भारतीय संस्कृती, गौरक्षणाचे महत्त्व, आई-वडिलांचे महत्त्व,वक्तृत्व व थोरांचे चरित्र आदी विषय शिकवले जात आहेत. सायंकाळी कीर्तन पठण करून रात्रीचा अभ्यास केला जात आहे. मारुती महाराज संस्थानच्या वतीने बालगोपालांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी व त्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास साध्य व्हावा या दृष्टिकोनातून गेल्या सात वर्षापासून या बाल संस्कार शिबिराचे आयोजन सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या श्री संत मारुती महाराज संस्थान येथे केले जात आहे. शिबिरातील मुलांना राहण्याची व्यवस्था संस्थेच्या वतीने केली असून, अन्नदानासाठी परिसरातील अन्नदात्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. या शिबिरासाठी रवींद्र महाराज पराळे, योगशिक्षक नामदेव महाराज जाणे,गायन शिक्षक पंकज राऊत, टाळ पावल्या शिक्षक दिनेश महाराज तट्टे, एकनाथ महाराज अलोने,सांस्कृतिक क्रीडा शिक्षक राजेंद्र महाराज खेरडे व परिसरातील महाराज परिश्रम घेत आहे. सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य वातावरणातील ही नैसर्गिक स्रातांजवळील शिबिर ही सहभागी शिबिरार्थींसाठी पर्वणीच आहे. भारतीय संस्कृती व परंपरा कशी आहे. ती शरीर, समाज, मन, आचार- विचारासह मनुष्याच्या वर्तणुकीसाठी किती लाभदायक आहे, याचेच संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांवर केले जात आहेत. या शिबिरात शिकणारा विद्यार्थी हा समाजात सद्गृहस्त म्हणून वावरावा. तो प्रामाणिक असावा, तसेच व्यसनापासून दूर रहावा हाच मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना भारतीय परंपरांच ज्ञान दिले जाते. ज्याप्रमाणे प्राचीन काळी गुरूकुलात विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारचे ज्ञान देऊन उत्तम नागरिक घडवले जायचे तसाच प्रयत्न येथे केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed