महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त‎महाराष्ट्रभर फिरणार विशेष चित्ररथ‎:समता,बंधुता, ज्ञानाचा संदेश देणारा उपक्रम, जिल्ह्यात १८ व १९ मे रोजी होणार आगमन‎

0
240_17784088786a005dae5255f_mahatmafule.jpg




प्रतिनिधी । मोर्शी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे. हा चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खा. समीर भुजबळ व आ. पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत हा चित्ररथ राज्यातील गावोगावी व शहरा-शहरांत फिरून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. चित्ररथात सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसह महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा विशेष आकर्षण ठरत आहे. महात्मा फुले लिखित पुस्तक, पेन यांसारख्या ज्ञानाच्या प्रतीकांची प्रभावी मांडणी करण्यात आली असून पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याची प्रतिकृतीदेखील चित्ररथात साकारली आहे. समता, बंधुता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश देणारा हा चित्ररथ ज्या शहरात पोहोचतो त्या ठिकाणी महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते. सामाजिक एकात्मता आणि जागृतीचा संदेश देण्यात येत आहे. या उपक्रमाला शिव- शाहू- फुले- डॉ. आं बेडकर विचारांच्या नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चित्ररथाचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान,समता परिषदेचे अमरावती जिल्हाध्यक्ष नंदकिशोर लेकुरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्ररथ जिल्ह्यात १८ व १९ मे रोजी फिरणार आहे. या निमित्ताने सर्व जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी चित्ररथाचे उत्साहात स्वागत करावे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पोवाड्यांचे आयोजन करावे, रांगोळ्या काढाव्यात, लेझीम, ढोल पथकांसह रॅलीचे आयोजन करावे असे आवाहन केले आहे. गावागावांत नागरिक एकत्र येतील अशा ठिकाणी महात्मा फुले यांच्या विचारांचे प्रबोधन करावे, असेही त्यांनी सांगितले. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येणारा हा चित्ररथ उपक्रम समाजात समतेची जाणीव अधिक दृढ करून नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed