जि. प. बदली सत्र- चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे रविवारीच स्थानांतर:आज आरोग्य विभागाचा दुसरा टप्पा; विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन
![]()
प्रतिनिधी | अमरावती जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी १० मे रोजी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनात सकाळी १० वाजता सुरु झालेली प्रक्रिया दुपारी थांबली. दरम्यानच्या काळात चार विभागातील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. शासन निर्णयानुसार समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात ही प्रक्रिया पार पडली. उद्या, सोमवारी आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहे. बदली सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. या प्रक्रियेत जनगणना सेवा नसलेल्या विविध विभागातील वर्ग-क कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती तसेच आपसी बदल्या करण्यात आल्या. आजच्या पहिल्या दिवशी महिला व बालविकास, कृषी, पशुसंवर्धन आणि वित्त व लेखा तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महिला व बालविकास विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या विनंतीवरून ४ बदल्या करण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदाच्या २ प्रशासकीय आणि १ विनंती बदली करण्यात आली, तर पशुधन पर्यवेक्षक पदासाठी २ प्रशासकीय व ४ विनंती बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात वित्त व लेखा विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या १ प्रशासकीय व १ विनंती बदली करण्यात आली, तसेच वरिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या २ प्रशासकीय, २ विनंती आणि १ आपसी विनंती (म्युच्युअल) बदली करण्यात आली. आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदाच्या १ प्रशासकीय व २ विनंती बदल्या करण्यात आल्या. याशिवाय आरोग्य सेवक (पुरुष) पदाच्या ८ प्रशासकीय आणि ७ विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. बदली प्रक्रियेदरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांना समुपदेशनाद्वारे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुसूत्रपणे आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्रीराम कुलकर्णी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) विलास मरसाळे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपआयुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, जिल्हा कृषी अधिकारी मल्ला तोडकर आदी अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक प्रशासन अधिकारी निलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत मेश्राम व पंकज गुल्हाने यांच्यासह हेमंतकुमार यावले, सुजित गावंडे, सतीश पवार, राहुल रायबोले आणि निशांत तायडे यांनी बदली प्रक्रियेचे कामकाज यशस्वीरित्या सांभाळले. नकारामुळे कृषी विभाग बाद ः कृषी विभागात नकार प्राप्त झाल्यामुळे बदली प्रक्रिया करण्यात आली नाही. दरम्यान दोन दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेंतर्गत आधी समुपदेशन आणि नंतर पसंतीनुसार बदली अशी कृती केली जात आहे. आरोग्य विभागाच्या बऱ्याचशा उपशाखा आहेत. त्यामुळे काही विभागाच्या बदल्या आज, रविवारी पूर्णत्वास गेल्या, तर काही बदल्या उद्या, सोमवारी पूर्ण केल्या जाणार आहेत. उद्याची प्रक्रियासुद्धा सकाळी १० वाजता सुरु होईल. जिल्हा परिषदेतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी साधारणत: १० टक्के कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व तेवढ्याच कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या केल्या जात आहे.
