देशात महिला आरक्षण विधेयक आणि डी-लिमिटेशन या दोन गोष्टी एकत्र येत आहेत… आणि हे संयोजन साधं नाही, तर राजकीय केमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट आहे ज्याचा रिझल्ट संपूर्ण देशाला भोगावा लागणार आहे.
सर्वात पहिला परिणाम लोकसभेचा आकारच बदलणार. 543 वरून थेट 816! म्हणजे लोकशाहीचा स्क्रीन साइज मोठा होणार, पण त्यातला कंटेंट किती सुधारेल, हा प्रश्न मात्र तसाच राहणार.
महिला आरक्षणामुळे 33% जागा महिलांसाठी राखीव होणार ऐकायला खूप प्रगतीशील. पण इथे ट्विस्ट असा की, त्या जागा देण्यासाठी आधी नवीन जागा तयार केल्या जात आहेत. म्हणजे आधी खुर्च्या वाढवा आणि मग त्यावर आरक्षित चा बोर्ड लावा. परिणाम काय? पुरुष नेत्यांना वाटणार आपली सीट गेली नाही, फक्त बाजूला अजून एक आली!
आणि महिला नेत्यांना वाटणार खरंच सत्ता मिळाली की फक्त सीट?
दुसरा मोठा परिणाम — डी-लिमिटेशन, म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना. हे ऐकायला तांत्रिक वाटतं, पण प्रत्यक्षात हा राजकीय गेम बोर्ड बदलण्याचा प्रकार आहे. जिथे आधी एक नेता मजबूत होता, तिथे मतदारसंघच बदलला की त्याची ताकद संपते. जिथे एखादा पक्ष कमजोर होता, तिथे नवीन रचना करून तो मजबूत होऊ शकतो. थोडक्यात खेळ तेच, पण मैदान बदललेलं!
तिसरा परिणाम — राज्यांमधील सत्ता संतुलन.जर लोकसंख्येवर आधारित बदल झाले असते, तर उत्तर भारताचं वर्चस्व वाढलं असतं आणि दक्षिणेकडची राज्यं मागे पडली असती. पण आता 50% सरसकट वाढ देऊन सरकार म्हणतंय सगळ्यांना खुश ठेवूया! परिणाम? कोणीही उघड नाराज नाही… पण सगळ्यांना आतून शंका आहे की खरंच न्याय झाला का?
चौथा परिणाम — निवडणूक राजकारणावर. 816 जागा म्हणजे बहुमताचा आकडा 409. म्हणजे निवडणुकीचं गणित पूर्ण बदलणार. जुने फॉर्म्युले, जुने समीकरण सगळं अपडेट करावं लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या पक्षाकडे आधीच मजबूत संघटना आणि संसाधनं आहेत, त्यांना या बदलाचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता.
पाचवा आणि थोडासा सेंसिटिव्ह परिणाम — आरक्षणाचं राजकारण अजून गहिरं होणार. SC, ST आरक्षण वाढेलच, पण OBC आरक्षणाबद्दल पुन्हा चर्चा पेटू शकते. महिला आरक्षणात OBC साठी वेगळं आरक्षण नाही त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता नक्की.
आणि शेवटी, सर्वसामान्य नागरिकावर परिणाम?
त्याच्यासाठी काय बदलणार? मतदारसंघ बदलेल, उमेदवार बदलेल, प्रचार बदलेल…पण त्याच्या रोजच्या आयुष्यातील प्रश्न नोकरी, महागाई, सुविधा हे तिथेच राहणार की बदलणार, हा खरा मुद्दा आहे.
थोडक्यात —
महिला आरक्षण आणि डी-लिमिटेशन हे फक्त कायदे नाहीत, तर देशाच्या राजकारणाचा रीसेट बटण आहेत.पण हा रीसेट सिस्टम सुधारण्यासाठी आहे की फक्त नवीन सेटिंग लावण्यासाठी हे ठरणार आहे पुढच्या काही वर्षांत. तोपर्यंत आपण काय?
नेहमीप्रमाणे अपडेट येईपर्यंत Wait करा… आणि मध्ये येणाऱ्या बग्सना सहन करा!
Post Views: 26
