आंबेडकरवादी साहित्य हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झाले आहे. हे साहित्य आंबेडकरी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. या साहित्य संस्कृतीची जगभरात दखल घेतली गेली आहे. त्यामुळे हे साहित्य वैश्विक स्वरुपाचे आहे. या विश्वाचे महासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. त्यामुळे यशवंत मनोहर हे आंबेडकरी साहित्यातील सूर्यमोलाचे बनले आहेत. कारण यशवंत मनोहर हे उजेडाच्या वैश्विक कुळाचे कवी आहेत. इहवादी विचारवंत आणि बुद्धीवादी वाङमयतत्वज्ञ म्हणून महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात ते सुप्रसिद्ध आहेत. म्हणूनच ते सूर्यमोलाचा माणूस बनले आहेत. मानवी जीवन अधिकाधिक सौंदर्यवान व्हावे, मानवी जीवन सममूल्य व्हावे आणि मानवी जीवनात इहनिष्ठ बंधुभाव आणि भगिनीभाव रुजावा या उदात्त ध्येयाने प्रेरीत होऊन आंबेडकर नावाच्या महासूर्याच्या दिशेने झेपावणारे सूर्यमोलाच्या तोलाचे एकमेव विचारवंत यशवंत मनोहर होत. मनोहरांनी आपल्या सूर्यस्वभावी लेखनातून गंजत चाललेल्या बुद्धीला उजेडाचा मुलामा दिला. हा उजेड ध्येयनिष्ठच होता. हा उजेड विकृत धर्मसंस्कृतीला आव्हान देणारा होता आणि आहे. हा उजेड जात्यांध आणि तृष्णांध शोषकप्रवृत्तींच्या मनात धडकी भरवणाराच आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या अभद्र युतीने प्रतिष्ठित केलेल्या नीतिमूल्यांना जाब विचारणाराच हा उजेड आहे. हा उजेड सूरृयमोलाचा उजेड असल्याने सर्वांच्याच हिताचा आहे. सर्वांच्या सर्व हितासाठीच या उजेडाने विषमतावाद्यांच्या अमानुष संस्कृतीला निर्भीडपणे ते हस्तक्षेप करतात. त्यामुळे त्यांच्या शब्दांना विश्वपण लाभलेले आहे. मनोहरांच्या समग्र साहित्य क्षितिजातून उगवलेल्या निरामय उजेडाने मानवी जीवनाला सौंदर्यमय करण्याचा ध्यास घेतलेला आहे. याच ध्यासातून विश्वभर आंबेडकरवादच उगवला आहे. हीच उगवण प्रतिक्रांतिवाद्यांच्या छावण्यांना बेचिराख करीत इथल्या सांस्कृतिक विचारविश्वात अजिंक्य झाली आहे.
पिढ्यान पिढ्यांच्या गावकुसाबाहेर करपून गेलेल्या प्रज्ञा प्रतिभांनी आंबेडकरवादी साहित्य निर्माण केले. या साहित्याला अपूर्व आणि बुलंद व्यक्तिमत्त्व होते. आगीचे आणि चांदण्यांचे एकजीवत्व साहित्यात एकमेवच होते. या प्रज्ञा प्रतिभांना लाभलेले हे एकजीवत्व धम्म क्रांतीमुळे शक्य झाले होते. या साहित्यातून धम्मक्रांतीचे सूर्यसाहित्य वजा केले तर साहित्य असेल परंतु ते साहित्य क्रांतीचे साहित्य असणार नाही. त्यात विद्रोहाचा अंगार असणार नाही. या साहित्यात आग असते. आगीच्या ज्वाळा असतात. या साहित्यातून सूर्य उगवतो आणि विश्वभर उजेड पसरतो. तडफड, तगमग हे रात्रीच्या कासावीस योनीतून बाहेर येतात. निश्चित इहवादी दिशा, बुद्धीप्रामाण्यवादी वैचारिक चारित्र्य आणि स्वयंपूर्ण, स्वयंशासित मानवत्वाचा निर्धार म्हणजे उजेडाचे साहित्य असते. या साहित्यात उरातील कल्लोळ असतात. जाती वर्ण वर्गविहीन समाज वास्तवाचे स्वप्न असते. या साहित्यातून पूर्ण प्रस्थापनेचा प्राण फुंकता येतो. या साहित्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध उभा राहतो. भारतीय संविधानाची प्रास्ताविका उभी राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासूर्य हा या साहित्याचा प्राण असतो. हा महासूर्यच या साहित्याचा कणा असतो आणि काळीजही असतो. तोच या साहित्याचा डोळा आणि दृष्टी असते. प्रेरणा आणि फलश्रुतीही असते. अभिव्यक्ती आणि आशयही असतो. तोच या साहित्याचा प्रारंभ आणि विजांची नक्षी काढणारी पायवाटही असते. सूर्य तळपत राहतो आणि तो मावळतच नाही म्हणूनच तो महासूर्य होतो. यशवंत मनोहर हे महासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओठावरील प्रलयंकारी सूर्य झाले आहेत. ते साहित्याची सूर्य संस्कृती झाले आहेत. अत्यंत बुलंद, पूर्णतः अंतर्विरोधविहिन असे वैचारिक अधिष्ठान सूर्यपालव्यांच्या प्रज्ञा प्रतिभांना लाभले. या देशात जडवादी चिंतनाची एक अत्यंत भक्कम आणि क्रांतीकारी परंपरा आहे. जीवनाचा वाहता प्रवाह गोठविणाऱ्या; अंधश्रद्धांमध्ये आणि विषमतेमध्ये सडवणाऱ्या सर्वच तत्वज्ञानांच्याविरुद्ध, साहित्याच्या विरुद्ध आणि रुढी परंपरांच्या विरुद्ध या जडवादी परंपरेने सततच उठाव केलेला आहे. ही जडवादी विचारपरंपरा धम्म क्रांतीने आंबेडकरी प्रतिभांच्या हवाली केली. यशवंत मनोहर ती एक सूर्यप्रतिभा होत.
मनोहरांची जडवादी भूमिका ही जीवनात आणि वाङमयात एकच आहे. काही लोकांना जीवनातील भूमिका वेगळी आणि वाङमयीन भूमिका वेगळी हे विनासायास जमते, नव्हे तर ते ठामपणे वेगळी मानतात. हे त्यांना प्रयत्न करूनही जमणारे नाही. ही त्यांची स्वाभाविक प्रकृतीच आहे आणि ती जीवनदृष्टी पुस्तकातून तयार झालेली नाही. ती भोवतीच्या वास्तवाची आणि वास्तवाच्या अनुभवाची निष्पत्ती आहे. केवळ जीवन जगणे आणि साहित्य निर्मिती करीत राहणे या भूमिका त्यांच्यासाठी नाहीत. ते द्वैती नाहीत. त्यांचा आणि या भूमिकेचा संबंध, ती त्यांनी पत्करली असा नसून या विवक्षित भूमिकेनेच त्यांचा स्वीकार केला असा होतो. शिवाय हा भूमिकास्वीकार हा मनोरंजनाचा भाग नाही. तो जीवनशैलीचा आणि निष्ठेचा भाग आहे. परंतु अनेक पातळ्यांवर स्वतःचे नुकसान करून घेण्याचा भाग आहे. असे असले तरी त्यांना या त्यांच्या भूमिकेशिवाय दुसऱ्या पद्धतीने जगता येणे अशक्य आहे. त्यांचा हा विचार आहे आचार यात द्वैत असणे केवळ अशक्यच आहे. माणसाचे जगणे अधिक अन्वर्थक करणारी हीच पद्धती आहे असे त्यांना नेहमी वाटत आले आहे. त्यामुळे त्यांची ओळख ही वाङमयीन भूमिका ही जीवनभूमिका अशीच आहे. ती जीवनवास्तवानेच त्यांच्या काळजाला बांधलेली आहे. ते स्वतःच सर्वार्थाने त्यांच्या जीवनविषयक भूमिकेचाच अविष्कार आहे. त्यांना समजून घेणे म्हणजे त्यांची जीवनदृष्टी समजून घेणे. ती समजली की, वेगळी काही गरजच उरत नाही. काही लोकांनी ती समजून न घेतल्यामुळे काही काळ वादही निर्माण झाले. हा माणूस म्हणून किंवा लेखक म्हणून सूर्यमोलाचा आणि पृथ्वीतोलाचा असला तरी तो संतप्त मनाचा नाही. या माणसाचे ज्वालाग्राही असणे हे त्यांच्या वाट्याला आलेले भोग आहेत. ते त्यांनी भोगलेले आहेत. तरीही बुद्धीवादाचा आणि प्रेमाचा परमप्रकर्ष ते आहेत. सर्व भावनांच्या शिखरांची परम उंची वाढवून त्याच उंचीच्या परमटोकावर धगधगत फुलणारे प्रेमही केले तरी माझा प्राण गदगदून, व्याकूळ होऊन रडतो, असे ते म्हणतात. ते म्हणतात की, मी जळत्या वाळवंटात झोकल्या गेलो. क्षणाचे चांदणे आणि अनंत काळाचे वाळवंट या वास्तवात तडफडत राहिलो. आगीत फुललो तर चांदण्यात जळलो. आपल्याला लेखक म्हणावे म्हणून लिहिणारे ते लेखक नाहीत. आंबेडकरवादी साहित्यातील एक सूर्यमोलाचा माणूस ते आहेत.
यशवंत मनोहर यांच्यावर अमोघ साहित्य संसदेवर अनेकांनी भाष्य केले आहे. ‘पर्यायाचे पडघम’ मध्ये डॉ. प्रकाश राठोड म्हणतात, यशवंत मनोहर यांच्या निखळ वाङमयीन व्यक्तिमत्वात धर्मांध सत्तेला आव्हान देणारे अनेक क्रांतिकारी आणि ज्वालाग्राही अविष्कार ठासून भरलेले आहेत. धर्मांध शोषणसत्तेने सबंध भारतीय समाजापुढे अनेक जीवघेणे प्रश्न आज उभे केलेले आहेत. या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मनोहरांनी घेतलेल्या भूमिकेवर अनेक कवींचा अपर्यायी विश्वास असल्यामुळे आजच्या काळातील सर्वच परिवर्तनवादी कवींचे ते उर्जास्रोत ठरले आहेत. मनोहरांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या अंतर्विरोधातील व्यक्तिमत्वावर निस्सीम प्रेम करणाऱ्या काही प्रतिभावंत कवींनी आपल्या कवितांमधून त्यांच्या इहनिष्ठ भूमिकेचा उत्कृट आणि सजग मनाने गौरव केला आहे. कारण हे सर्व कवी मनोहरी विद्यापीठात शिकलेले आहेत. मनोहर सर आपण कविता का लिहितो याचे बहुपर्यायी विश्लेषण करतात. आपण कविता लिहितो म्हणजे हस्तक्षेप आणि पर्याय लिहितो. आपण कविता लिहितो म्हणजे नवनव्याने उगवण्याची कृती लिहितो. म्हणजे माणूस म्हणून स्वतः चे निर्माण करण्याची प्रक्रिया लिहितो. सम्यक होण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा निर्धार लिहितो आणि अत्तसूर्य होण्यासाठी आणखी नवनवे उजेड लिहितो. आपण कविता लिहितो म्हणजे आपल्यावरील जातीधर्माची धूळमाती दूर करणारी आपल्या मूळ मानवी अस्तित्वाची प्रस्थापना लिहितो. आपण कविता लिहितो म्हणजे माणसाच्या जगण्यायोग्य जगण्याचा शोध लिहितो. माणसाला स्वतंत्र करणारा आपल्या अस्तित्वाचा आकांत लिहितो. दडपलेल्या, चिरडलेल्या आवाजांसाठी मुक्तीचा प्रबंध लिहितो. इतिहासाचे वळण लिहितो आणि उष:कालाच्या हाका लिहितो. आपण कविता लिहितो म्हणजे जीवनाला हवा तो चांदण्याचा माणूस लिहितो आणि अंधाराला सूर्य शिकवणारा शब्द लिहितो. जीवनाच्या पराभूत वळणावर माणसाला महान ठरविणारा शब्द लिहितो. माणूस अजिंक्य आहे हा उर्जानिरोप लिहितो.
आजचा काळ साहित्यिकांच्या अग्निपरीक्षेचा काळ आहे. काळ आणीबाणीचा आहे. फॅसिस्ट आणि सरंजामी प्रणालीशी तुम्हाला नाते जोडता येत नाही. तसे झाले तर तुम्ही लेखक म्हणून अस्तित्वात राहू शकत नाही. युद्धाचा भडका उडत आहे. जग बुद्धाच्या नव्हे तर युद्धाच्या दिशेने चालले आहे. यात सर्व सामान्य माणूस भरडला जात आहे. त्यामुळे लेखकाने अस्वस्थ व्हायला हवे. जगभरातील मूलतत्त्ववाद्यांनी मानवी जनजीवनात भयग्रस्तता आणि सुरक्षितता माजविली आहे. जातीय, धार्मिकतेच्या कट्टरतावादाने माणूसकी जळत चालली आहे. तुमच्या शहरात तुमच्यावर चोहोबाजूंनी लक्ष ठेवल्या जात आहे. धर्म आणि सत्तेविरोधीच्या तुमच्या कारवायांना आळा घालण्यात येत आहे. ज्या दिशेने जग जात आहे त्यात सामान्य माणसाला कुठेही स्थान नाही. मूल्यांना, सज्जनपणाला, समाजवादाला आणि इहवादाला कुठेही स्थान दिसत नाही. हिटलर आणि मनूची युती निर्माण झालेली आहे. भांडवलशाही आणि सरंजामशाही ही दोन्ही अशुभे सातत्याने एकत्र येत चालले आहेत आणि नव्या समाजनिर्मितीच्या प्रक्रियेला हतबल करीत चालले आहेत. अशा विषारी पर्यावरणात माणूस जगूच शकत नाही. परंतु जात, धर्म यांची कुंपणे स्वतःच्या मनाला घालून घेणारांमध्ये आजचे आपले बहुतांश लेखक सामिल होत आहेत. संकुचितांच्या बोळीमध्ये माणसे अधिकाधिक शिरत आहेत. जातीय आणि धार्मिक दहशतवादाची आग अग्रक्रमाने प्रखर केली जात आहे. सामान्य आणि सज्जन माणूस भयभीत झाला आहे. लेखकांनी केवळ प्रेक्षक होऊ नये. लेखक होणे म्हणजे जबाबदार होणे असते. आपण साहित्यिक म्हणून मौन बाळगणे म्हणजे आपल्यातले सत्व संपवून टाकणे. लेखकांनी आता आपला कस पणाला लावला पाहिजे. काळाच्या कसोटीवर खरे उतरले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आंबेडकरवाद हाच पर्याय आहे. याच दिशेने तुम्हाला चालायला हवे. तुमच्या शहरातल्या, देशातल्या आणि जगातल्याही सर्व प्रश्नांची उत्तरे या आंबेडकरवादात आहेत. हेच सूर्य सत्य आहे. यशवंत मनोहर जेव्हा जबाबदारीने सर्वांना निर्वाणीचा इशारा देतात तेव्हा हेच सूर्यसत्य सांगतात. सर्वसामान्य माणूस तुमच्या साहित्याच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. आंबेडकरवादी साहित्यच सामान्य माणसाला मौल्यवान बनविते.
माणूस केंद्रस्थानी ठेवणारे आंबेडकरवादी साहित्य हे १९७० नंतरच्या काळात मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आले. हे केंद्र बुद्धीवादी माणुसकीच्या जाणिवेचे होते. या केंद्राच्या विरोधी शक्ती महाराष्ट्रात, देशात आणि जगातही काम करीत होत्या आणि करीत आहेत. एन्ड ऑफ आयडीयालाॅजी, एन्ड ऑफ हिस्ट्री या दिशेने एन्ड ऑफ मॅन अशी एक छावणी जागतिक पातळीवर काम करीत आहे. परंतु आंबेडकरवादी साहित्य तर ग्लाॅरी ऑफ मॅन चा वसा घेऊनच जन्माला आले आहे. जगात खूप माणसे आहेत जी एन्ड ऑफ आयडीयालाॅजी होणार नाही यासाठी कटिबद्ध झालेली आहेत. माणसाची उज्जवलता, महानता ज्यांना जपायचीही आहे आणि वृद्धिंगतही करायची आहे, अशीही माणसे जगात खूप आहेत. आंबेडकरवादी साहित्याचे केंद्र जागतिक पातळीवरील उज्ज्वल माणुसकीच्या केंद्राशी रक्तानेच जोडलेले आहे. त्यामुळे भांडवली जागतिकीकरणाशी समाजवादी जागतिकीकरणाचा विग्रह होणे येत्या काही दशकांत अटळ आहे. या विग्रहातून समाजवादी जागतिकीकरणाच्या विजयासाठी जी वाङमयीन आघाडी संभवते तिचे वैचारिक नेतृत्व करण्याची जबाबदारी आंबेडकरवादी साहित्यावर म्हणजेच साहित्यिकांवर असल्याचा इशारा मनोहर सर देतात. नेतृत्वाचा हा प्रश्न भाषा, राष्ट्र या पातळ्यांवर असणार नाही. हा प्रश्न मूल्यांच्या संदर्भातील असणे अटळ आहे. समाजवादी जागतिकीकरण ही बाब संपूर्ण मानवतेच्या कल्याणाला केंद्र करणारी असल्याने यातून विविध भाषी, विविध भौगोली, विविध तपशिली पण मूल्यदृष्ट्या एककेंद्रित वैश्विक वाङमयविश्व पुढल्या काळात जन्माला येईल. हे विश्व मानवमुक्तीचे तेज:पुंज वाङमयविश्व असेल. हे विश्व मानवी सन्मानाचेही असेल. आंबेडकरवादी साहित्याला एकविसाव्या शतकात दोन जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. एक म्हणजे या साहित्याने स्वतः सौंदर्यसंपन्न रहायचे आहे. म्हणजेच वाङमयीन महत्ता असलेल्या साहित्यकृतीही जगाला द्यायच्या आहेत आणि माणसाला सन्मानाने जगता येईल असे जगही निर्माण करायचे आहे. दुसरी जबाबदारी मोठी आहे. माणूस आणि माणसांचा विश्वसमुह यांच्यातील नाते, माणसाच्या आणि या विश्वसमुहाच्या जगण्याचे ताणतणाव, द्वंद्वे यांचे सर्वांगीण पातळ्यांवरील निरीक्षण आणि निराकरण या साहित्याने करायचे आहे. तरच हे साहित्य मानवी जीवनातील सर्वच दुर्धर दुखण्यांवर महाऔषधी ठरेल.
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.
Post Views: 32
