सफाई कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ वेळेत द्या-अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर


आरोग्य,निवास,शिक्षण यांच्यासह सर्व लाभ वेळेत देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करा

नांदेड –  स्वच्छतेच्या माध्यमातून समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे. शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या प्रगतीसाठी विविध योजनांचे लाभ नियमानुसार व वेळेत देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात सफाई कामगारांच्या अडचणी व प्रश्नांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गंगाधर इरलोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विभागप्रमुख तसेच सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. हदगाव नगर परिषदेअंतर्गत प्रलंबित प्रकरणावर येत्या आठ दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करा. तसेच समितीनुसार असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना अध्यक्ष श्री. डागोर यांनी दिल्या.

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष शिबिरे आयोजित करून आयुष्मान भारत कार्ड व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत घरकुल, समाजकल्याण विभागाच्या योजनांद्वारे पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, तसेच महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळामार्फत उद्योगासाठी कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती, साप्ताहिक सुटी, नियमित वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रलंबित लाभ तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले माध्यमांशी बोलताना अध्यक्ष  डागोर यांनी सांगितले की, भविष्यात सफाई कर्मचारी कंत्राटी न राहता नियमित कर्मचारी करण्यावर भर देणार असल्याचे त्यानी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी समन्वयाने कार्य करून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावेल, अशी ग्वाही दिली. प्रारंभी नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी सादरीकरणाद्वारे विविध बाबींची माहिती दिली.


Post Views: 100






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *