’पवार साहेब आज कुठे उभे आहेत?’ – VastavNEWSLive.com


राज्यसभेवर पुन्हा निवड झाल्याबद्दल पवार साहेबांचे जाहीर अभिनंदन. ते बौद्धिक मानसिक, शारीरिक दृष्ट्या समाज आणि देशाचे प्रश्न सोडविण्याबद्दल  आजही सक्षम असल्याने आणि इच्छाशक्ती प्रचंड असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी योग्य आणि दिशादर्शक ठरतो.
* पवार साहेब हे शाहू फुले आंबेडकर ही परंपरा मानणारे आणि पाळणारे एक सेल्फ मेड राजकीय नेतृत्व आहे.
* पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेली व्यक्ती, नंतर बहुजन नेता, नंतर मराठा स्ट्रॉंग मॅन, आणि आत्ता पवार कुटुंबाचे. असा राजकीय प्रवास झाल्याचे दिसते.
* लोकशाही देशात आपल्या घरातूनच लोकप्रतिनिधी  देण्याची वेळ त्यांच्यावर का आली? त्याचा बहुजनांच्या हितावर काय परिणाम होईल याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
*अजित दादांचा अपघाती मृत्यू ही खूप दुर्दैवी आणि क्लेशकारक घटना आहे. दादांच्या बद्दल मोठा आदर असला तरी ते लोकशाही प्रक्रियेतून पुढे आलेले नेते नव्हते. कुटुंबातून पाठबळ नसते तर गावचे नेते बनणे अवघड होते. त्यांची प्रसिद्धी राजकीय मुत्सद्दी म्हणून नव्हे तर प्रचंड वेग असलेला राजकीय व्यवस्थापक (political manager) म्हणून आहे. वेगाचे कौशल्य असलेला ड्रायव्हर आपल्या गाडीच्या एक्सीलेटर वर लक्ष ठेवतो आणि दाब देतो. गाडी वेगात पळते. पण असा ड्रायव्हर मैलाच्या दगडावरील गावाचे नाव वाचण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे तो भलत्याच गावात पोचतो. दादांचं तसंच झालं. गाडीभर पुरावे आहेत असे म्हणणाऱ्या नितीन,देवेंद्र या बामनांनी लावलेल्या वाघरीत ते अलगत अडकले. बहुजनातील लाभार्थींना वेगाचे आकर्षण असते. अजित दादा लाभार्थींचे आयकॉन बनले.दादा त्यांच्याकडे गेल्यामुळे सगळे बहुजन ब्राह्मणाच्या दावणीला बांधले गेले. त्यामुळे  ब्राह्मण  जमात दादा वर जाम खुश झाली होती.
*सुप्रिया ताई अभ्यासू आणि  वक्तृत्व कलेत निपुण पण ते आमच्या मतदारसंघात जाणवले नाही.
*आदरणीय सुनेत्रा ताई आणि पार्थ हे खरे तर पवार कुटुंबाच्या राजकीय महत्त्व कांक्षेचे बळी ठरलेले आहेत. त्यांना तशी ज्वलंत राजकीय अभिलाषा ,प्रेरणा  दिसत नाही. पण निव्वळ बचाव करत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना राजकीय पदे स्वीकारावी लागतात असे दिसते.
* पवार साहेब करिष्मा युक्त असल्याने खऱ्या लोकशाही प्रक्रियेतून नेते बनले. त्याला रॅशनल लिगल मॉडेल म्हणतात. अजित दादा आणि इतर हे पूर्वी पोलीस पाटलाचा मुलगा पाटील बनत असे त्या परंपरागत पद्धतीने नेते बनले. पुढे त्यांची पत्नी व मुलगा हे देखील नेते बनले त्याला ट्रॅडिशनल मॉडेल म्हणतात.
*आपली लिखित राज्यघटना खूप आदर्श आहे पण प्रत्यक्षात  विकसनशील देशांमध्ये ती जशीच्या तशी अमलात आणता येत नाही असे ’फ्रेड रिग्ज’ यांनी दाखवून दिलेले आहे. भारतीय  राजकीय पद्धती  इथल्या सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था आहे. भारतातील सामाजिक व्यवस्था ही वर्णव्यवस्थेवर आधारित असून ब्राह्मण वर्ण प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे पवार साहेबांना माहीत आहेच. म्हणूनच  फुले शाहू आंबेडकर विचाराचा प्रभाव असलेले ते एकमेव प्रभावी नेते होते व आहेत. मग त्यांनी ब्राह्मणी व्यवस्था झुगारण्याचा प्रयत्न का केला नाही हा प्रश्न उरतो.
* इथे पवार साहेबांच्या  व्यक्तिमत्त्वातील द्वंद्व असावे. एक सुधारणावादी (reformist) बनून बहुजन समाजाचे हित  साधायचे की  समाजाशी जुळवून घेणारा एक (conformist )बनून सत्ता मिळवून बहुजन समाजाचे हित साधायचे?
आमच्या अल्पमतीनुसार त्यांनी समाजाशी जुळवून घेणारा राजकारणी बनून सत्ता मिळवून राजकारणी बनण्याची  भूमिका स्वीकारल्याचे दिसते. इथेच आमच्या सारख्याला त्यांच्या आजच्या या अवस्थेची कारणे  दिसतात. कायम जुळवून घेण्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व, आत्म सन्मान राहत नाही.
* गांधी नेहरूचा विचार ही राजकीय विचारधारा  त्यांनी मान्य केलेली असली तरी तशी  रचना, कार्यपद्धती, अंमलबजावणी आणि प्रशिक्षण  काँग्रेसमध्ये असताना किंवा बाहेर पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठेच दिसली नाही. पक्की विचारधारा असलेले कुणी कार्यकर्ते दिसले नाहीत.
*फुले शाहू आंबेडकर,…., विचारधारेचे अनेक जातीतील तसेच स्वतःला मराठा म्हणविणारे अनेक होतकरू तरुण त्यांच्याभोवती जमा झाले. त्यांनी पदे मिळविली.भोगली .पण पोट भरल्यानंतर गोधडीत शिरलेल्या ढेकणाप्रमाणे टच्च फुगून ती बाहेर पडली. शाहू फुले आंबेडकरांना बदनाम केले.
* पंतप्रधान बनण्याची क्षमता असल्याने तसेच सर्व समावेशकता व सर्वांना मदत करणे हा पवार साहेबांचा चांगुलपणा असल्याने महाजन, नितीन गडकरी सारखे धूर्त कावेबाज ब्राह्मण भोवताली जमले.
*पवार साहेबांचे राजकारण संपले असे एका बाजूला देवेंद्र बोलत असतात दुसऱ्या बाजूला पवार साहेबांचा नाद करायचा नाय अशी वक्तव्य नितीन गडकरी करत राहिले. पण खरे तर या दोघांनाही पवार साहेबांच्या राजकीय खेळीची मर्यादा लक्षात आलेली असावी
*पवार साहेबांना बामणी कावा असलेली आरएसएस ज्या पद्धतीने काम करते त्याची कल्पना होतीच तरीपण ते  आरएसएस व त्यांचे कार्यकर्ते यांच्या त्यागाचे ,सचोटीचे व मेहनतीचे जाहीर कौतुक करत होते. कदाचित ते वरवरचे असेल पण सामान्य माणसाला आरएसएस कार्यकर्त्याबद्दल आदरच वाढत गेला.
*प्रशासनावर त्यांची पकड होती अनेक मोठे प्रकल्प राबविले पण ते त्यांच्या व्यक्तिगत करिष्मावर. त्यामध्ये लोकप्रशासनाची अशी शिस्तबद्ध शास्त्रीय योजना संस्थिकृत ( institutionalize) झाली नाही.
*रथयात्रा काढून आणि नंतर बाबरी मशिदीचा ढाचा पाडून बहुसंख्यांक विरुद्ध मुस्लिम दरी निर्माण करण्याच्या प्रयत्नाची पवार साहेबांनी दखल घेतलेली दिसत नाही. आयोध्या घटनेनंतर पंधरा वर्षे पवार साहेबांची सत्ता होती पण त्या काळात मानसे जोडण्याचे प्रयत्न एखादे प्रशासकीय धोरण किंवा नाविन्पूर्ण योजना आखून राबवण्याच काम झाले नाही. तसे मोहल्ला कमिटी भिवंडी मॉडेल मी त्यांना भेटून सांगितले होते. भिवंडी दंगल 1984 (ग्रंथाली प्रकाशन 1992) हे पुस्तकही भेट दिले होते.
*आर आर पाटील सारखे प्रामाणिक व गरिबाबद्दल तळमळ असलेले नेते होते पण सनातनी धर्माच्या नावाखाली काम करणाऱ्या ब्राह्मणाविरुद्ध ठोस कारवाई करायला ते कचरले. कारण एकच, कारवाई केली तर आपल्याला मतपेटी मध्ये धोका निर्माण होईल. त्यातूनच मनोहर कुलकर्णी बाबा पुरंदरे सारखे कडवे ब्राह्मण फुगले.
*सरकारी नोकरीमध्ये महिलांना 30 टक्के प्रतिनिधित्व ही ऐतिहासिक कामगिरी झाली. परंतु डीएसपी कलेक्टर झालेल्या बहुजनांच्या पोरी “भिऊ नकोस मी….”असे म्हणत रामदासी बैठका चे समर्थन करू लागल्यात.
* गांधी नेहरू विचाराचे आहोत असे जाहीर केले परंतु त्या पक्षाशी फारकत घेऊन आपल्या मुलीला भाजप मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवावे या साठी चर्चा झाली होती असे वाचनात आले होते. देवेंद्रजींच्या सरकारला बाहेरून जाहीर पाठिंबा दिला होता.
* मेधा कुलकर्णी नावाच्या लोकप्रतिनिधी  हिंदू धर्म  आणण्याबद्दल जाहीरपणे वक्तव्य करतात त्याबद्दल पवार साहेब, त्यांचा पक्ष यांनी प्रतिक्रिया दिल्याचे ऐकिवात नाही.
*बहुजन हिताचे काम करणाऱ्या आमच्यासारख्यांना भीती ही वाटते की पवार साहेबांच्या करिश्मामुळे निर्माण झालेले त्यांच्या घरातील हे नेते सगळ्या लाभार्थी बहुजनांना बरोबर घेऊन या ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविले जातील. राज्य घटनेची जागा सुधारित मनुस्मृति घेईल.
* पवार साहेबांनी  सर्व बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर बनविला. राष्ट्रीय पातळीवर आपले क्रमांक एकचे स्थान निर्माण केले त्याबद्दल त्यांना सलाम.पवार साहेबांचा प्रचंड मोठा आवाका, मोठं काम, एक दूरदृष्टी याबद्दल आदर दाखवून त्यांचे राजकीय मॉडेल कालबाह्य का झालेले आहे? याबद्दल बोलूया यथावकाश.
– सुरेश खोपडे

(लेखक पवार साहेब यांच्या मतदार संघात  राहणारा आहे. पवार साहेबांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती पेक्षा त्यांचा मोठा  समर्थक आहे. त्यांच्या काळात 35 वर्ष  सनदी अधिकारी  म्हणून काम केलेले आहे. सुप्रियाताई यांचे विरुद्ध 2014 साली निवडणूक लढवलेली आहे. लेखकाच्या नोकरीच्या काळात अगर निवृत्ती नंतर पवार साहेबांच्या कडून त्यांनी विशिष्ट हुद्द्यावर बदली, प्रमोशन पाहिजे, अशी विनंती केली नव्हती. सरकारी प्लॉट फ्लॅट यासारखी कोणतीच मदत घेतलेली नाही. 2024 च्या निवडणुकीत पवार साहेबांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतलेला आहे. सदर पोस्ट ही लोकशाही प्रक्रिया सुदृढ बनावी आणि बहुजनांच्या हिताचे कार्य व्हावे या प्रांजल हेतूने लिहिलेली आहे.)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *