नांदेड (प्रतिनिधी) – पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना विशेष न्यायाधीश तानाजी सोलंकर यांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा सध्या काही दिवसांचा मुक्काम तुरुंगात असणार आहे.
या प्रकरणात खासगी अभियंता सतीश मधुकर वाघोळे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित कनिष्ठ लिपिक सुकेश भीमराव नहारे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पेट्रोल पंपाच्या एनओसीची प्रक्रिया लवकर पूर्ण करून देण्यासाठी तसेच कागदपत्रांमध्ये वारंवार त्रुटी न काढण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना १ ऑक्टोबर २०२६ रोजी एसीबीने सापळा रचून कारवाई केली.
एसीबीच्या पडताळणीदरम्यान लाचेच्या मागणीसंदर्भात दोन्ही आरोपींमधील संभाषण आणि सहमतीची माहिती समोर आल्याचे तपास यंत्रणेने नमूद केले आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे ₹१.२० लाखांची रक्कम स्वीकारताना सतीश वाघोळे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर सुकेश नहारे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासासाठी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, शनिवार आणि रविवार असल्याने पुढील न्यायालयीन प्रक्रिया सोमवारी होण्याची शक्यता आहे. आरोपींच्या वतीने ऍड. सतीश सोनारीकर ऍड. मनीष रामेश्वर खांडील उर्फ शर्मा हे काम पाहत आहेत. सोमवारी जामीन अर्ज दाखल झाल्यानंतर तपास यंत्रणेचे म्हणणे मागविले जाईल. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यावर न्यायालय जामिनाबाबत निर्णय घेणार आहे.
त्यामुळे अडीच लाखांच्या कथित लाचेपैकी ₹१.२० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारल्याच्या प्रकरणात अडकलेल्या दोन्ही आरोपींचा तूर्तास तुरुंगात मुक्काम कायम राहणार आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया अर्थात जमीन कधी मिळणार हे सोमवार नंतर होणाऱ्या जामीन अर्जाच्या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे.
