Diwali Lantern

पुण्यात 1,317 बेवारस वाहनांचा वाहतूक शाखेकडून लिलाव:मालकांना 15 दिवसांची मुदत; दावा न केल्यास वाहने शासनजमा होणार




पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरून १,३१७ बेवारस वाहने हटवली आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या वाहनांचा आता जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. ही वाहने हडपसर येथील रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, समर्थनगर परिसरातील वाहन डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. ही वाहने दीर्घकाळापासून रस्त्यांवर पडून होती, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षित हालचालींवरही परिणाम होत होता. पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी ही माहिती दिली. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ८५ (१) अन्वये सुरू करण्यात आली आहे. वाहतूक शाखेने या वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या नागरिकांची वाहने या बेवारस वाहनांच्या यादीत असण्याची शक्यता आहे, त्यांनी रामटेकडी येथील वाहन डम्पिंग यार्डमध्ये जाऊन वाहनांची पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित वाहनावर मालकी हक्क असल्यास, प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत संबंधित वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक किंवा सहायक पोलिस निरीक्षकांसमोर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. विहित मुदतीत कोणत्याही वाहनाच्या मालकाने किंवा कायदेशीर हक्कदाराने मालकी हक्क सिद्ध केला नाही, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ८७ मधील तरतुदीनुसार संबंधित वाहने शासनाच्या स्वाधीन असल्याचे मानले जाईल. त्यानंतर या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अनावश्यकपणे व्यापून ठेवणाऱ्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. या कारवाईमुळे रस्त्यांवरील अडथळे दूर होऊन वाहतुकीला अधिक मोकळीक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳