![]()
महावितरण कंपनीने लागू केलेल्या सौर ऊर्जा धोरणाविरोधात गुरुवारी अमरावतीतील सौर उद्योजक आणि विक्रेत्यांनी तीव्र निदर्शने केली. हे धोरण उद्योजक आणि ग्राहकविरोधी असल्याचा आरोप करत, अमरावती सोलर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली ३०० हून अधिक उद्योजक व विक्रेत्यांनी महावितरणच्या मुख्यालयावर (विद्युत भवन) मोर्चा काढला. गेल्या अनेक दिवसांपासून या धोरणात बदल करण्याची मागणी केली जात होती, मात्र त्यात कोणताही बदल न झाल्याने हा मोर्चा काढण्यात आला. कठोरा नाक्यावरून निघालेला हा मोर्चा विद्युत भवनावर धडकला. मोर्चाचे विसर्जन झाल्यानंतर, आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले. सौर क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या नियमांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ते तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. सौर ऊर्जा पर्यावरणासाठी पूरक असून देशाच्या ऊर्जा स्वावलंबनासाठी महत्त्वाची आहे, मात्र सध्याचे धोरण सौर उद्योजक आणि ग्राहकांसाठी अडथळे निर्माण करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या मोर्चामध्ये अमित देवतळे, आकाश मारोटकर, विनय वैद्य, प्रीती मोरे, शुभम डगवार, शुभम मांझरे, प्रतीक याउल, अनिकेत यावले, कपिल टावरी, अतुल अनासाने, अनिरुद्ध पांडे, अभिजीत सव्वालाखे, सुमित इंगळे, अभिषेक राठोड, अखिलेश यादव, विक्रांत जोशी यांच्यासह अनेक सोलर उद्योजक व विक्रेते सहभागी झाले होते.
महावितरणच्या सौर धोरणाविरोधात उद्योजक, विक्रेत्यांचा मोर्चा:अमरावतीत मुख्यालयावर धडक; धोरण मागे घेण्याची मागणी
