दुबईत 15 अमरावतीकर अडकले, उड्डाणे तीन दिवसांपासून बंद:इराण-इस्रायल युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत, मदतीसाठी प्रशासनाकडे साकडे




इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील विमानसेवा विस्कळीत झाल्याने १५ अमरावतीकर पर्यटक गेल्या तीन दिवसांपासून दुबईत अडकले आहेत. विमानतळ प्राधिकरणाने सलग तीन दिवसांची उड्डाणे रद्द केल्यामुळे त्यांचा मायदेशी परतण्याचा प्रवास लांबणीवर पडला आहे. हे पर्यटक दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे आणि युद्धाच्या शक्यतेमुळे दुबई विमानतळ प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे अमरावतीतील अनेक कुटुंबांना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडकलेल्या पर्यटकांना मदत मिळावी यासाठी अमरावती येथील हौशी पर्यटक ग्रुपने पुढाकार घेतला आहे. ग्रुपचे प्रमुख विजय शिंदे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांची भेट घेऊन त्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याची विनंती केली. अडकलेल्यांमध्ये सुनील चपटे, रजनी चपटे, डॉ. प्रसाद चपटे, कांता राठी, गणेश राठी, श्रेया राठी, डॉ. आशिष मालानी, सपना मालानी, राजकुमार राठी, कविता राठी यांसह नमूना चौथी गल्ली येथील चपटे परिवारातील सदस्य हेमंत राठी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांचा समावेश आहे. सूत्रांनुसार, या सर्वांचे २ मार्च रोजी दुबई ते मुंबई असे विमान तिकीट आरक्षित होते. परंतु, २ मार्च रोजीच त्यांना युद्धजन्य परिस्थितीमुळे उड्डाणे रद्द झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. प्रसाद चपटे यांनी विजय शिंदे यांना दिलेल्या माहितीनुसार, दुबई विमानतळ प्राधिकरणाने ३ ऐवजी ५ मार्च रोजी उड्डाणे सुरू होतील असे सांगितले होते. त्यामुळे त्यांना सध्या ‘नाईट कॅसल’ हॉटेलमध्ये मुक्काम वाढवावा लागला आहे. दुबई प्रशासनाने नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी घातली असून, पुढील सूचना मिळेपर्यंत जागा न सोडण्याचे आवाहन केले आहे. ५ मार्च रोजी उड्डाण सुरू होणार होते, परंतु ते झाले की नाही, याबाबतची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. अडकलेल्या अमरावतीकरांच्या मदतीसाठी विजय शिंदे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा प्रशासनाने ही माहिती राज्य शासनाला कळवली असून, त्यांच्यामार्फत आवश्यक ते प्रयत्न केले जात असल्याचे उत्तर दिले. प्रशासनाने जारी केलेल्या हेल्पलाईनवरही असाच अनुभव आल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *