'गाडी हळू चालव' म्हटल्याचा आला राग:टोळक्याचा घरावर हल्ला, टिटवाळा परिसरातील घटना; गुन्हा दाखल




कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात ‘गाडी हळू चालव’ असे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून एका पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर भीषण हल्ला करत घराची तोडफोड केली आहे. या बेदम मारहाणीत कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून, ही खळबळजनक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा येथील आंबेकर चौक परिसरातील आर. के. चाळ आणि राजेश्वरी बिल्डिंगजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. तक्रारदार 50 वर्षीय झुल्फेकर अली अब्दुल्ला खान हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशनचे काम करतात. 3 मार्च रोजी ते घराबाहेर उभे असताना एका तरुणाने भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याने खान यांनी त्याला ‘गाडी हळू चालव’ असे सांगितले. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने वाद घातला आणि काही वेळातच आपल्या वडिलांना व इतर साथीदारांना घेऊन पुन्हा घटनास्थळी आला. काही वेळातच या टोळीने शिवीगाळ करत लोखंडी वस्तूंनी खान यांच्या घराची तोडफोड सुरू केली. हल्लेखोरांनी झुल्फेकर खान यांच्या डोक्यात गंभीर प्रहार केला आणि तोंडावर मारहाण केल्याने त्यांचे दोन दात पडले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हिंसक हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली असून, या भीषण हल्ल्यात एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी आता पाच जणांविरोधात टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *