![]()
प्रतिनिधी | चांदूर रेल्वे शिव जयंती निमित्त हिंदू समाजातील एकात्मता, संस्कृती, सामाजिक ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित हिंदू संमेलन मालखेड येथे उत्साहात झाले.कार्यक्रमाची सुरुवात दुपारी २ वाजता श्री दत्त मंदिर देवस्थान येथून कलश यात्रेने झाली. गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या यात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पारंपरिक वेशभूषा, हरि भजनाचा गजर, घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संमेलनात विदर्भ प्रांत ग्राम जागरण प्रमुख अनिल गावंडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. हिंदू समाजाच्या संघटनाची गरज, संस्कृतीचे जतन, सामाजिक समरसतेबाबत मार्गदर्शन केले. प्रचारिका डॉ. मोनिका उमक यांनी हिंदू जागरण व महिला सक्षमीकरण यावर विचार मांडले. यावेळी महंत आदेश महाराज पुरी यांचेही शिवचरित्र व हिंदू एकात्मता याविषयी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संयोजन शिवानंद महाराज पुरी यांनी केले. त्यांनी सांगितले की, हिंदू समाजाच्या विकासात अडथळा जर कोणता असेल, तर तो म्हणजे जातीभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव. तो दूर झाला तर हिंदू समाजाचा,पर्यायाने देशाचा सर्वांगीण विकास होईल. सहसंयोजक किसनराव रसाल महाराज यांनी व्यसन मुक्तीच्या चळवळीत तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता भारतमातेच्या आरतीने केली . त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले . संमेलनास परिसरातील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते. यामध्ये मालखेडसह लालखेड, सावंगा विठोबा, हातला, मोगरा, दहिगाव, बुधली, कवठा व उतखेड येथील नागरिकांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन रवि कलाने यांनी तर आभार सुषमा चौकडे यांनी केले.
भेदभाव दूर झाल्यास हिंदू समाजाचा सर्वांगीण विकास-शिवानंद महाराज:मालखेड येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात, नागरिकांचा चांगला प्रतिसाद
