शिवाजीनगर ऑटो पॉईंटवर महिलांशी गैरवर्तणुकीच्या तक्रारी; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शिवाजीनगर ऑटो पॉईंटवर महिलांशी गैरवर्तणुकीच्या तक्रारी; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर परिसरातील ऑटो पॉईंटवर सायंकाळच्या वेळेत महिलांशी गैरवर्तणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कामावरून घरी परतणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना काही ऑटो चालकांकडून अयोग्य वर्तन तसेच अवमानकारक बोलणे केले जात असल्याची माहिती संबंधित महिलांनी दिली आहे.

शिवाजीनगर येथून श्रावस्ती नगर आणि आंबेडकर नगर परिसराकडे जाण्यासाठी दररोज अनेक महिला या ऑटो पॉईंटचा वापर करतात. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी काही चालकांकडून उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित ऑटो थांबा हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असतानाही त्या ठिकाणी प्रभावी पोलीस बंदोबस्त किंवा नियंत्रणाची व्यवस्था नसल्याची नाराजी महिलांनी व्यक्त केली आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित ठिकाणी नियमित पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही व्यवस्था कार्यान्वित करावी तसेच नियमभंग करणाऱ्या ऑटो चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व महिलांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *