नागपूर एसबीएल स्फोट प्रकरण:मृतांचा आकडा 19 वर, मालकासह 21 अधिकाऱ्यांवर 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा; आतापर्यंत 9 जणांना बेड्या




नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. स्फोटाची तीव्रता आणि झालेली जीवितहानी पाहता, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर केला. तपासाअंती कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार, कळमेश्वर पोलीस ठाण्यात कंपनीचे मालक संजय चौधरी, संचालक मंडळ, प्लांट हेड, प्रोजेक्ट मॅनेजर, सुपरवायझर आणि सेफ्टी ऑफिसर अशा २१ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटकेतील ९ आरोपींची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडून पाहणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “राज्याच्या सुरक्षेशी आणि कामगारांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना सोडले जाणार नाही,” असा इशारा यावेळी बावनकुळे यांनी दिला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पथके उर्वरित आरोपींच्या मागावर आहेत. वारसांना ७ लाखांची मदत जाहीर या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पोस्टमॉर्टम आणि ओळख पटवण्याचे आव्हान दरम्यान, रविवारी सायंकाळी मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे, मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाल्याने पोलिसांनी मृतांच्या नातेवाइकांना डीएनए ओळखीसाठी आणले होते. गोळा केलेले सर्व नमुने पुढील विश्लेषणासाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. नेमकी घटना काय? नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी भयंकर स्फोट झाला. त्यात १८ कामगार ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, आणखी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९ वर पोहोचला आहे. नागपूर जिल्ह्यात यापूर्वीही घडल्या स्फोटाच्या घटना यापूर्वीही नागपूर जिल्ह्यात स्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. 16 फेब्रुवारी 2025 रोजी कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स या फटाके निर्मिती कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर तीन कामगार जखमी झाले होते. नागपूर-काटोल रोडवरील कोतवालबर्डी तालुक्यात एनविरा येथे 225 एकर परिसरात असलेल्या या कंपनीत फटाक्यांच्या कव्हरमध्ये बारूद भरण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला होता. त्याचप्रमाणे, 25 जानेवारी 2025 रोजी भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जण ठार झाले होते आणि 7 जण जखमी झाले होते. सकाळी 11 वाजता झालेल्या या स्फोटामुळे कंपनीचे छत कोसळले होते. त्यावेळी 12 व्यक्ती काम करत होत्या. याव्यतिरिक्त, 31 मे 2016 रोजी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लष्कराच्या केंद्रीय दारूगोळा डेपोमध्ये भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 2 अधिकाऱ्यांसह 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 19 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर आजूबाजूची 6-7 गावे रिकामी करण्यात आली होती आणि 1 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *