![]()
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील जुनी राजकीय धुसफूस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या ‘क्लस्टर विकास योजने’ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. केवळ विरोधच नव्हे, तर नाईक यांनी नाव न घेता शिंदेंवर घणाघाती टीका करत “माझ्या नादाला लागलात तर…” असा थेट इशाराच दिल्याने ठाणे आणि नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबईच्या नियोजनाचा संदर्भ देत गणेश नाईक यांनी नगरविकास खात्याच्या नव्या धोरणांवर सडकून टीका केली. “क्लस्टर डेव्हलपमेंटचे सध्या केवळ एक फॅड उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर या शहरात युडीसीपीआर नियमावली पूर्णपणे लागू केली गेली, तर सेक्टर ९ सारख्या भागात भयंकर परिस्थिती निर्माण होईल. भविष्यात गाड्या-बाईक तर दूरच, पण लोकांना या पदपथांवरून चालतानाही एकमेकांना धक्के मारून जावे लागेल,” अशी भीती गणेश नाईक यांनी व्यक्त केली. माझ्या नादाला लागाल तर… आपल्या आक्रमक शैलीत बोलताना गणेश नाईक पुढे म्हणाले, “गणेश नाईकच्या नादाला कुणी लागला, तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही.” त्यांचा हा रोख थेट नगरविकास खात्याची धुरा सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदेंकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे-नवी मुंबईतील वर्चस्वाची जुनीच लढाई ठाणे आणि नवी मुंबई पट्ट्यावर नेमके कोणाचे निर्विवाद वर्चस्व राहणार? यावरून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते आज महायुती सरकारचा भाग असले तरी, त्यांच्यात सातत्याने खटके उडताना दिसतात. सिडको भूखंडांवरून जुने आरोप यापूर्वीही गणेश नाईक यांनी सिडकोचे मोक्याचे भूखंड थेट बिल्डरांच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप नगरविकास खात्यावर केला होता. “जर जनतेच्या सोयीसुविधांसाठी भूखंड मिळत नसतील, तर मग हे मंत्रिपद काय चाटायचे आहे का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी आपल्याच सरकारमधील नगरविकास खात्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. नवी मुंबई महापालिकेतील निधीचा झालेला गैरवापर आणि सोयीस्कररीत्या करण्यात आलेली प्रभाग रचना, या मुद्द्यांवरूनही गणेश नाईक यांनी सातत्याने शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. हे ही वाचा… धर्म सरकारच्या नियंत्रणात नाही!:’महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्या’विरोधात हायकोर्टात जाणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या सुधारित ‘धर्म स्वातंत्र्य कायद्या’विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर करत, आंबेडकर यांनी E20 इंधनाचा वाद, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाया आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा… संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल:जयकुमार गोरेंवरील वक्तव्य भोवले, अवमानकारक भाषेचा वापर केल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५६(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सविस्तर वाचा…
महायुतीत ठिणगी:'माझ्या नादाला लागलात तर तुमची जागा…'; क्लस्टरच्या मुद्द्यावरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना उघड इशारा
