![]()
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सगळेच नेते भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी विधानसभेत आणि विधानपरिषदेत वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. यावेळी विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, पालिकेला अजून जाग आलेली नाही. शहरातील हवा गंभीर पातळीवर पोहोचली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केवळ छापील उत्तर देऊ नये, तर प्रत्यक्ष परिस्थिती जाणून बोलावे. कधीतरी खिडकी उघडून बाहेरची स्थिती पहावी, असा टोला ठाकरे यांनी लगावला. पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, मराठा आरक्षण आणि कर्जमाफीच्या निवडणूकपूर्व घोषणा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत, भ्रष्टाचारामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. तसेच राज्याच्या इतिहासात प्रथमच विधानसभेत आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, भाजप नेमके कुणाला घाबरत आहे? असा सवालही त्यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांवरही चिंता व्यक्त केली. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पुण्यात कॉंग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळली:भ्रष्टाचारामुळे राज्याच्या तिजोरीवर भार, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
