कुत्रा चावल्याने रेबीज होण्याच्या भीतीने आत्महत्या:बँकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; मुंबईतील धक्कादायक घटना




कल्याण पूर्वेकडील तिसगाव नाका परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे आपल्याला ‘रेबीज’ होईल आणि आपल्यामुळे कुटुंबाला त्रास होईल, या भीतीपोटी एका बँकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आयाश विश्वनाथ अमीन असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आयाश हा कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका भागातील ‘सहजीवन सोसायटी’मध्ये वास्तव्यास होता. तो एका नामांकित बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी आयाश याला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्र्याने चावा घेतल्यावर त्याने तातडीने रेबीजचे इंजेक्शनही घेतले होते. मात्र, या घटनेनंतर तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. मानसिक भीती ठरली जीवघेणी मिळालेल्या माहितीनुसार, इंजेक्शन घेतले असूनही आयाशच्या मनात रेबीजची मोठी दहशत बसली होती. आपल्याला रेबीजची लक्षणे दिसत आहेत, असा त्याचा समज झाला होता. आपण जिवंत राहिलो तर आपल्यामुळे घरच्यांनाही या आजाराचा त्रास होईल किंवा त्यांना धोका निर्माण होईल, या भीतीने त्याला ग्रासले होते. याच मानसिक वैफल्यातून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर; पालिका आयुक्तांकडे धाव या घटनेनंतर कल्याणमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने तातडीने आणि कडक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *