![]()
राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवार, २६ फेब्रुवारीपासून अमरावतीत सुरू होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच अमरावती शहराला या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला असून, आठवडाभरात एकूण ४३ नाटकांचे सादरीकरण केले जाईल. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले आणि उपाध्यक्ष विलास इंगोले यांनी सोमवारी दुपारी याबाबत माहिती दिली. खासदार डॉ. बोंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, अमरावतीची ओळख विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे. गेल्या काही वर्षांतील विविध नाट्य स्पर्धांमध्ये अमरावतीने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ही स्पर्धा येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत राज्यभरातील विभागीय नाट्य स्पर्धांमधील विजेत्या संघांचा समावेश आहे, ज्यात अमरावती विभागातील ८९ बालनाट्यांपैकी प्रथम पाच बक्षिसे जिंकणाऱ्या नाटकांचाही सहभाग आहे. ही स्पर्धा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. ॲड. डोरले यांनी स्पष्ट केले की, ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी खुली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. दररोज सकाळी १० वाजल्यापासून पाच ते सात नाटकांचे सादरीकरण केले जाईल. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेचे सहकार्यवाह मिलींद कहाळे, स्पर्धेचे संयोजक विशाल फाटे, नाट्य दिग्दर्शक-लेखक-कलावंत हर्षद ससाने आदी पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती शहराची ओळख पूर्वापार कलावंत, लेखक, कवी आणि गझलकारांचे शहर म्हणून आहे. पूर्वी दहिसाथ परिसरातील इंद्रभुवन थिएटरमध्ये साहित्यिक कार्यक्रम आणि नाटकांचे सादरीकरण होत असे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एका कार्यक्रमासाठी येथे आल्यावर हरिभाऊ कलोती स्मारकात मुक्काम केला होता. प्रसिद्ध सिनेकलाकार नाना पाटेकर, मोहन चोटी, दादा कोंडके यांसारख्या दिग्गजांनीही या शहराला अनेकदा भेट दिली आहे. ही नाट्य स्पर्धा सलग ४ मार्चपर्यंत चालणार आहे. या कालावधीत २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धुलीवंदनाचा सण आहे. या सणांच्या दिवशीही नाटकांचे सादरीकरण करावे लागणार आहे. काही नाट्यकलावंत आणि पालकांनी या दिवशी सुटी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे.
अमरावतीत पहिल्यांदाच राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी:26 फेब्रुवारीपासून आठवडाभरात 43 नाटकांचे सादरीकरण
