![]()
अमरावती येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या ६७० विकासकामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार कामांमध्ये योग्य तो बदल करून ही विकासकामे करण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना वेग मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत सांडपाणी निचऱ्यासाठी नाली, पाणीपुरवठा, सिमेंट रस्ते, एलईडी लाईट आणि पेविंग ब्लॉक बसवणे यांसारख्या ६७० कामांची निवड करण्यात आली होती. मात्र, या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकच्या कामांचे प्रमाण जास्त असल्याने ही कामे बदलविण्याची सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी केली होती. पालकमंत्र्यांनी सांडपाणी व्यवस्थापन, गटार व्यवस्था आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, गट विकास अधिकाऱ्यांनी जुन्या यादीतील ११२ कामांमध्ये बदल करून नवीन कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे आता सर्व ६७० विकासकामे सुरू होणार आहेत. समाजकल्याण अधिकारी डी.एम. पुंड यांच्या माहितीनुसार, या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकऐवजी आता आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कामांमध्ये गटारे, पाणीपुरवठा यावर भर दिला जाणार आहे. सर्व कामांचे जिओ टॅगिंग आणि छायाचित्र पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले आहेत. बदललेल्या ११२ कामांचे प्रस्ताव ग्रामपंचायत ठराव, प्रमाणपत्रे आणि अंदाजपत्रकासह तातडीने प्रशासकीय मान्यतेसाठी मागविण्यात आले आहेत.
दलित वस्ती सुधार योजनेतील 670 कामांवरील स्थगिती उठवली:पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार बदल; ग्रामीण विकासाला मिळणार गती
