नवीन पाणी योजनेला विलंब:संभाजीनगरमध्ये जीपीएसविनाच टँकरच्या कोट्यवधींच्या बिलांना दिली मंजुरी




उन्हाळ्याची अधिकृत चाहूल लागण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर शहरावर पाणीटंचाईचे गडद संकट ओढवले आहे. शहराची नवीन पाणीपुरवठा योजना अद्याप कागदावर आणि अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या शहरातील अनेक भागांत तब्बल ६ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून यामुळे महापालिकेच्या टँकरवरील अवलंबित्व वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यातच टँकरची संख्या ८४ वरून १०० च्या उंबरठ्यावर पोहोचल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान सुमारे ३८ किमी लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे आणि शहरात ५५ नवीन जलकुंभ उभारण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. ही योजना पूर्ण झाल्यास शहराला अतिरिक्त २०० एमएलडी पाणी मिळणार असून एकूण क्षमता ४०० एमएलडीपर्यंत पोहोचणार आहे. मुख्यमंत्री स्तरावरून ऑक्टोबर २०२५ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र वारंवार मुदतवाढ मिळूनही काम पूर्ण न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. जीपीएस यंत्रणेचा अभाव आणि भ्रष्टाचाराचे आरोप ‘दिव्य मराठी’च्या विशेष वृत्तानुसार, महापालिकेच्या टँकरना जीपीएस प्रणाली बसवणे अनिवार्य आहे. असे असतानाही अनेक टँकर या प्रणालीशिवाय धावत असूनही कंत्राटदारांची कोट्यवधींची बिले मंजूर केली जात आहेत. स्मार्ट सिटी कार्यालय आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. ‘नो नेटवर्क झोन’मध्ये नागरिकांचे हाल ज्या भागांत अद्याप पाइपलाइन पोहोचलेली नाही अशा ‘नो नेटवर्क झोन’मधील वस्त्यांची अवस्था दयनीय आहे. येथे टँकर हीच एकमेव जीवनवाहिनी आहे. मात्र, टँकर येण्याच्या वेळा निश्चित नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना तासन््तास प्रतीक्षा करावी लागत आहे. याचाच फायदा घेत खासगी कंत्राटदारांची चांदी होत असल्याचे आरोप होत आहेत. राजकीय हस्तक्षेप आणि कंत्राटदारांची मक्तेदारी शहरातील टँकर पुरवठ्याचा ताबा ‘राम इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘शेख कन्स्ट्रक्शन’ या दोन प्रमुख कंत्राटदारांकडे आहे. हे कंत्राट राजकीय दबावाखाली देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आरटीओ तपासणी न करताच हे टँकर रस्त्यावर धावत असून या संपूर्ण प्रकरणाचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. टँकरची कोणतीच नोंद नाही वसाहतींना महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी कंत्राटदारांना ठेका दिलेला आहे. हे कंत्राटदार आरटीओंकडून टँकरची तपासणी न करताच पाणीपुरवठ्यासाठी वापरत आहेत. महापालिका प्रशासनाकडेही या टँकरची कोणतीच नोंद नाही. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी या कंत्राटदारांना पाठीशी घालत असून टँकरचे ऑडिट करावे. – अंबादास दानवे, माजी विरोधी पक्षनेता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *