![]()
भारत-अमेरिकेत झालेल्या व्यापार करारामुळे कृषी क्षेत्रावर गंभीर दुष्परिणाम होणार असून, हा करार रद्द व्हावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एल्गार पुकारणार आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या कराराच्या विरोधात गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील ५३ ठिकाणी एकाच वेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होते. शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेने उत्पन्न अल्प होत असून, शेती परडवत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच भारत-अमेरीकेत झालेल्या व्यापार करारामुळे शेतीवर गंभीर दुष्पपरिणाम होणार असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे असून, याच अनुषंगाने आंदोलन उभे करण्यासाठी १४ फेब्रुवारी पक्षाची बैठक पार पडली. बैठकीत शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख सेवकराम ताथोड, उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हा संघटिका माया म्हैसने, सरिता वाकोडे, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, योगेश्वर वानखडे, जिल्हासंघटक भूषण भिरड, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गावंडे, गजानन मानतकर, गजानन चौधरी, ब्रह्मा पांडे, शहर प्रमुख आशिष गावंडे, राहुल कराळे, मनपा गटनेता विजय इंगळे, नगरसेवक अभय खुमकर, सागर भारुका, सोनाली सरोदे, मनोज पाटील आदी उपस्थित होते. लुटारुंची टोळीच सक्रिय : आधीच भारतात शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या काही व्यापाऱ्यांची टोळीच सक्रिय आहे. हे उद्योगपती-मोठे व्यापारी भाजपचे दलाल आहेत. या उद्योगपतींचा आर्थिक फायदा व्हावा, यासाठी सरकारने नवीन कायदे, करार करीत असल्याचा घणाघात आ. देशमुख व जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केला. केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात राज्यातील भाजपप्रणित महायुती सरकारामधील मंत्री, नेते एकही शब्द काढत नाही. आपल्या उद्योगपती मित्रांसाठी धोरणे राबवणारे महायुती सरकारमधील मंत्र्यांची दातखडी शेतकरी हिताचा निर्णय घेताना बसते काय, असा संतप्त प्रश्न करीत आ. देशमुख यांनी भाजपच्या शेतकरी विरोधी कारभाराचा समाचार घेतला. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपालिका तसेच महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात अकोट, बाळाळापूर नगरपरिषद तसेच महापालिकेतील नगरसेवकांचा समावेश होता. शिवसेनेत पक्षप्रवेश : बैठकीत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील सकलेन खान पठाण तसेच प्रभाग क्रमांक १८ (शिवसेना वसाहत) मधील कृष्णा साठे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्षात प्रवेश केला. केवळ निवडणूक, सत्तेसाठी भाजप शेतकऱ्यांसह सर्वच मुद्दे हाताळत असल्याचा आरोप शिवसेनेकडून बैठकीत करण्यात आला. अशातच आगामी काळात जिल्हा परिषद निवडणूक होणार असून, शिवसेना व्यापारी करारच्या विरोधात सातही तालुक्यात आंदोलन करणार आहे. एरवी आंदोलन तालुक्याच्या मुख्यालयी, महामार्गावर किंवा निवडक मोठ्या फाट्यांवर होते. मात्र जिल्हा परिषदेच्या ५३ सर्कलमध्ये रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यात तेल्हारा तालुक्यातील ७ सर्कल, अकोट ९, मूर्तिजापूर ७, अकोला १०, बाळापूर ७, पातूर ६ आणि बार्शीटाकाळी तालुक्यातील ७ ठिकाणांचा समावेश आहे. करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरिफमध्ये मोठी कपात झाली असून, टेरिफ २५ टक्केवरुन १८ टक्के झाल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ही धुळफेक असल्याची टीका आ. नितीन देशमुख यांनी केली. तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी व मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात टेरीफ २.७५ टक्केच होता. आताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात टेरीफमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारला जाग येण्यासाठी शिवसेना थेट रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचेही आ. देशमुख म्हणाले.
व्यापार कराराविरोधात शिवसेना उबाठा पुकारणार तीव्र आंदोलन:गुरुवारी 53 ठिकाणी होणार रास्ताराेकाे
