हिंगोलीच्या व्यापाऱ्याची 23 लाखांची हळद घेऊन ट्रक चालक बेपत्ता:मध्यप्रदेशातील चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल




हिंगोली शहरातील दोन हळद व्यापाऱ्यांची २३.५० लाख रुपये किंमतीची ६०६ कट्टे हळद घेऊन ट्रक चालक बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी मध्यप्रदेशातील एक ट्रक चालका विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ७ फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता ट्रक चालकाचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील संतोष भक्कड व कार्तीक चेपूरवार हे व्यापारी हळद खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी खरेदी केलेली हळद बिहार राज्यातील गया येथील माँ शक्ती ट्रेडर्स या व्यापाऱ्याला हळद विक्री केली होती. त्यानुसार विक्री केलेली हळद नेण्यासाठी मध्यप्रदेशातील बारीगठ येथील ट्रक चालक शिवम बेलदार हा ट्रक घेऊन आला होता. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमधून तसेच आदर्श महाविद्यालयाच्या परिसरातील असलेल्या गोदामातून २३.५० लाख रुपये किंमतीची ६०६ कट्टे हळद ता. २९ जानेवारी रोजी ट्रकमध्ये भरण्यात आली होती. यामध्ये व्यापारी भक्कड यांच्या मालकिची ९.३४ लाख रुपये किंमतीची २०० कट्टे तर व्यापारी चेपूरवार यांच्या मालकिची १४.१६ लाख रुपये किंमतीची ४०६ कट्टे हळदीचा समावेश होता. सदर ट्रकमध्ये हळद भरल्यानंतर ट्रक बिहारकडे निघाला. मात्र किमान चार दिवसांत ट्रक बिहार येथे पोहोचणे अपेक्षीत असतांना अद्यापही ट्रक तेथे पोहोचलाच नाही. त्यामुळे व्यापारी भक्कड व चेपूरवार यांनी ट्रक चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही शिवाय मोबाईल देखील बंद होता. काही दिवस वाट पाहिल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच व्यापारी भक्कड यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी ट्रक चालक शिवम बेलदार (रा. वारीगढ, जि. छतरपुर, मध्यप्रदेश) याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, शिवाजी ठोंबरे, शेख मुजीब यांच्या पथकाने ट्रक चालकाचा शोध सुरु केला असून त्यासाठी पथकेही रवाना केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *