नाशिक हिरावाडीत ज्वेलर्समध्ये गोळीबार, दरोडा:भरवस्तीत रात्री 9 वाजता न्यू समृद्धी ज्वेलर्समध्ये धुमाकूळ, कर्मचारी जखमी, दुकानमालक महिलेचा रुद्रावतार
![]()
हिरावाडीतील भरवस्तीत रात्री 9 वाजता सराफ दुकानात 6 बंदुकधारी शिरले. त्यांनी बंदुका रोखत दुकानातील तिघांना मारहाण केली आणि गोळीबार करून दागिने लुटून पसार झाले. यात एक कर्मचारी जखमी झाला. रात्री उशिरा पंचवटी पोलिसांनी दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतले. या घटनेत दुकान मालक नयना पगारिया यांनी जोरदार प्रतिकार केला. नयना पगारिया यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. हिरावाडीत ‘न्यू समृद्धी ज्वेलर्स’ नावाचे सराफ दुकान आहे. रात्री 9 वाजता दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना, दुकानात एक महिला कर्मचारी आणि श्रीश्रीमाळ उपस्थित होते. त्याचवेळी 6 दरोडेखोर दुकानात घुसले. त्यांनी कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखत जागेवर गोळ्या घालण्याची धमकी दिली. मात्र, मालक नयना यांनी बंदुकीला न घाबरता जोरदार प्रतिकार केला. श्रीश्रीमाळ यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या डोक्यावर बंदुकीने वार करून जखमी केले. नयना यांनी काउंटरवरून उडी मारत दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोर तीन दुचाकींवरून फरार झाले.
खासगी रुग्णालयात उपचार गंभीर जखमी अमित श्रीश्रीमाळ यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोक्यात बंदुकीचे पाच वार असल्याने रक्तश्राव झाल्याने त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहे. हिरावाडी परिसरात प्रचंड दहशत हिरावाडी हा पंचवटीतील अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. सप्तशृंगी कॉलेज, मीनाताई ठाकरे स्टेडियम, तारवाला नगर, आडगाव नाका अशा महत्त्वाच्या भागांमध्ये या परिसरातून जाता येते. मोठ्या इमारती, दुकाने आणि रुग्णालये या परिसरात आहेत. कायम वर्दळीच्या या परिसरात रात्री 9 वाजता झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. घटना घडताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले असले, तरी आता पोलिसांचा धाकच राहिला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत होत्या. एकाने गोळीबार केला. माझा प्रतिकार सुरुच होता, आराडाओरड केल्याने दरोडेखोर बिथरले सराफ दुकानात वर्दळ कमी होती. आम्ही दुकान आवरून सर्व दागिने काउंटरवर काढून बॅगेत भरण्याच्या तयारीत होतो, तितक्यात अचानक तीन दुचाकींवरून सहा जण आले. त्यांच्या तोंडावर मास्क होते. आम्ही तिघे जण दुकानात होतो. काही कळण्याच्या आतच दरोडेखोरांनी आमच्यावर बंदूक रोखली. मी न घाबरता त्यांना प्रतिकार केला. तरीही एकाने गोळीबार केला. माझा प्रतिकार सुरूच होता. सहकारी श्रीश्रीमाळ यांनीही प्रतिकार केला. आम्ही दोघा दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाने श्रीश्रीमाळ यांच्या डोक्यात बंदुकीचा मागील भाग मारला. मी काउंटरवरील प्लेट त्यांच्यावर फेकून मारली. काउंटरवर चढून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. ते थोडे बिथरले, मात्र त्यांनी काउंटरवरील काही दागिन्यांचे बॉक्स घेऊन पळ काढला. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड भीती पसरली आहे.- नयना पगारिया, दुकानमालक
