मालेगावच्या महापौरपदी IP च्या शेख नसरीन बानो:उपमहापौरपदी SP च्या शान – ए – हिंद; भाजप, MIM च्या तटस्थेचा इस्लाम पार्टीला लाभ


मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या (IP) शेख नसरीन बानो खालिद, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान – ए – हिंद यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजप व एमआयएमने तटस्थ भूमिका घेतली. त्याचा लाभ थेट इस्लाम पार्टीला झाला. मालेगाव महापालिकेत आज जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात महापौरपदासाठी एकूण 5 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. पडताळणीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, शेख ताहेरा रशीद व शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचा अर्ज वैध ठरला. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यात इस्लाम पार्टीच्या शेख ताहेरा शेख रशीद यांनी आपला अर्ज मागे घेतला. परिणामी, शेख नसरीन बानो व लता घोडके यांच्यात थेट लढत झाली. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत शेख नसरीन बानो खालिद यांना 43 मते मिळाली. तर शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांना केवळ 18 मतांवर समाधान मानावे लागले. यामुळे नसरीन बानो यांचा 25 मतांच्या फरकाने दणदणीत विजय झाला. भाजप – एमआयएमची तटस्थ भूमिका महापालिका सभागृहात झालेल्या आजच्या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5, काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 18, भाजपचे 2 व एमआयएमचे 21 नगरसेवक उपस्थित होते. भाजप व एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्यामुळे त्याचा थेट लाभ इस्लाम पार्टीच्या उमेदवाराला झाला. सप व काँग्रेसची मतेही या पक्षाला मिळाली. उपमहापौरपदी शान – ए – हिंद दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या शान – ए – हिंद यांचा विजय झाला आहे. त्यांना शिवसेनेच्या अॅड. नीलेश काकडे यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीसाठी एकूण 8 अर्ज दाखल झाले होते. पडताळणीनंतर शान-ए – हिंद यांच्यासह, एमआयएमचे हाफीज अब्दुल्ला मुफ्ती इस्लाईल, शिवसेनेचे नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, नीलेश काकडे, सपचे मोहम्मद मुश्तकीन मोहम्मद मुस्तफा यांचे अर्ज वैध ठरले. पैकी हाफीज अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, मोहम्मद मुश्तकीन मोहम्मद मुस्तफा व नरेंद्र सोनवणे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शान – ए – हिंद यांना 43 मते पडली, तर नीलेश काकडे यांना अवघ्या 18 मतांवर समाधान मानावे लागले. सपच्या उमेदवाराला इस्लाम पार्टी व काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला. हिरव्या अन् भगव्या पोशाखाची चर्चा उल्लेखनीय बाब म्हणजे या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टी, सप व काँग्रेसचे नगरसेवक लक्झरी बसमधून एकत्रितपणे महापालिकेत दाखल झाले होते. महिला सदस्यांनी काळ्या बुरख्यावर फेटे, तर पुरुष सदस्यांनी डोक्यावर हिरवे फेटे व अंगावर इस्लाम पार्टीचा गमच्छा परिधान केला होता. त्याची स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. शिवसेनेचे नगरसेवकही भगवे शर्ट, साड्या व भगवे फेटे घालून सभागृहात आले होते. या निवडणुकीसाठी महापालिका परिसरात जोरदार बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खालील तक्त्यात पाहा मालेगाव मनपातील पक्षीय बलाबल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *