पुण्यात वाहनांची तोडफोड करणारा मुख्य आरोपी जेरबंद:तीन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी घेतले ताब्यात




पुणे शहरात घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. राजरत्न कुलदीप खरे (वय 20, रा. एसआरए वसाहत, भीमनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 31 जानेवारी रोजी खरे आणि त्याचे अल्पवयीन साथीदार दुचाकीवरून बी. टी. कवडे रस्ता परिसरात आले होते. त्यांनी शस्त्रे उगारून परिसरात दहशत निर्माण केली. एका दुकानात शिरून तोडफोड केली, तसेच अनेक वाहनांचेही नुकसान केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला. पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, राजू कदम, शिवाजी जाधव, योगेश जाधव आणि राहुल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई करत खरे याच्यासह अल्पवयीनांना ताब्यात घेतले. मकोका गुन्हा दाखल झालेला आरोपी अटक दरम्यान, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय 28, रा. कदम चाळ, संतोषी माता मंदिराजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ठोंबरे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गेल्या वर्षी ‘मकोका’ कारवाई केली होती. कारवाईनंतर ठोंबरे फरार झाला होता आणि पोलिस त्याचा शोध घेत होते. ठोंबरे हा सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमले, सागर बोरगे, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे आणि किरण साबळे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *