मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन ट्रक पलटी, दोघांचा मृत्यू:बोरघाटजवळ भीषण अपघात, वाहतूक ठप्प

0
0de488fd-9e56-4ff3-8837-7ce9f719a98c_1778860765499.jpg




मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाट परिसरात शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका ट्रकने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात तिन्ही ट्रक रस्त्यावर पलटी झाले, ज्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५:०५ वाजताच्या सुमारास एक्सप्रेसवेवरील मुंबई वाहिनीवर किमी ३८.१०० जवळ घडला. पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या (KA.56-2199) या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने समोरील (RJ-19-GG-4175) आणि कंटेनर ट्रक (MH.04-GR-2874) यांना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही ट्रक महामार्गावर पलटी झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये रंगाचे डब्बे आणि केमिकल पावडरच्या बॅगा होत्या. ट्रक पलटी झाल्याने हा सर्व माल रस्त्यावर सांडला, ज्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चारही लेनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात धडक देणाऱ्या पहिल्या ट्रकचा चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. दुसऱ्या ट्रकचा चालक वीर बळराम (रा. राजस्थान) आणि कंटेनर ट्रकचा चालक जिशान अली (वय ३१, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिस आणि खोपोली पोलिस स्टेशनचे पथक अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. खालापूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, खोपोलीचे पोलिस निरीक्षक हिरे आणि बोरघाट महामार्ग पोलिसांचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी तातडीने मदतकार्याची सूत्रे हाती घेतली. आयआरबी कंपनीची पेट्रोलिंग टीम, ‘देवदूत’ यंत्रणा आणि खोपोलीतील सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या टीमनेही बचावकार्यात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed