मालेगाव महापालिकेत सत्तेचा पेच:MIMच्या आमदारांनी घेतली मंत्री दादा भुसेंची भेट, सेक्युलर फ्रंट बहुमताच्या उंबरठ्यावर




मालेगाव महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा पेच अधिकच गडद झाला असून, राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजप आणि काँग्रेसने अनपेक्षितपणे एकत्र येत भारत विकास आघाडी या नव्या गटाची 30 जानेवारीला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच भाजप नगरसेवकांनी या नोंदणीला विरोध दर्शवणारा आणि गट रद्द करण्याचा अर्ज दिल्याने खळबळ माजली आहे. यामुळे मालेगावच्या महापौरपदाच्या शर्यतीत नेमका कोणता पक्ष बाजी मारणार आणि सत्तेचे समीकरण काय असेल, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. दुसरीकडे, एमआयएमच्या आमदारांनी राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे यांची भेट घेतल्याने आता एमआयएम आणि शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मालेगावमध्ये इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून निवडणूक लढवली होती, ज्यांच्याकडे सध्या 40 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. बहुमतासाठी 43 चा आकडा गाठणे आवश्यक असताना, या त्रिशंकू परिस्थितीमुळे मालेगावच्या सत्तेचे पारडे नेमके कोणत्या बाजूला झुकणार, याकडे आता चंद्रपूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असून, 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटकडे सध्या सर्वाधिक 40 नगरसेवक असून, बहुमताचा 43 हा आकडा गाठण्यासाठी त्यांना केवळ तीन मतांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने पाठिंबा दिल्यास या आघाडीचा महापौर विराजमान होऊ शकतो. मात्र, दुसरीकडे एमआयएमनेही राजकीय जुळवाजुळव सुरू केल्याने मालेगावच्या सत्तेचे समीकरण नेमके कोणत्या वळणावर थांबणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल आणि गटनेते अब्दुल मलिक यांनी मंत्री दादा भुसे यांची घेतलेली भेट सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या भेटीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदारांनी बगल दिली, तर गटनेत्यांनी दिलेली उत्तरे पाहता एमआयएम आणि शिवसेना यांच्यात छुपी युती होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या दोन दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली असताना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या गुप्त खलबतांमुळे मालेगावचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सध्याच्या संख्याबळाचा विचार करता, महापालिकेत बहुमतासाठी 43 या ‘मॅजिक फिगर’ची आवश्यकता आहे. सभागृहात इस्लाम पार्टीकडे 35, एमआयएमकडे 21 आणि शिवसेनेकडे 18 नगरसेवक आहेत. तर भाजपचे 2 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक आपली भूमिका बजावणार आहेत. या अटीतटीच्या लढतीत अवघ्या 3 जागा असलेली काँग्रेस ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे. मात्र, ऐन मतदानाच्या काही तास आधी अनेक नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने मालेगावात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढील 48 तासांत सत्तेचे पारडे नेमके कोणाकडे झुकते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *