नाले स्वच्छता, अतिक्रमण हटवण्यासह काटेकोरपणे उद्यान देखभालीचे निर्देश:झोन २ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त नाईकांकडून पाहणी‎

0
240_17784156906a00784ae281a_udan.jpg




प्रतिनिधी । अमरावती शहरातील नाले स्वच्छता, अतिक्रमण हटवण्यासह काटेकोरपणे उद्यान देखभाल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील विविध परिसरांची पाहणी केल्यानंतर दिले. शहरात सध्या नाले व लहान नाल्यांची स्वच्छता तसेच उद्यानांची देखभाल, दुरुस्ती, अतिक्रमणाची समस्या आ वासून उभी आहे. नागरिक सातत्याने याबाबत तक्रारी करीत असल्यामुळे मनपा प्रशासनाला या समस्यांची विशेष दखल घेण्यास बाध्य व्हावे लागले. याच अनुषंगाने आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तही शहराच्या विविध भागात पाहणी करीत आहेत. फरशी स्टॉप, दस्तूर नगर, बालाजी मंगल कार्यालयाजवळील नाला, कवर नगर परिसरातील नाले व रस्ते, व्ही.आय.पी. अपार्टमेंट शेजारील नाला, शंकर नगरचा नाला तसेच केडिया नगर उद्यान परिसराची अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी केली. पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त यांनी सर्व नाल्यांची नियमित व सखोल स्वच्छता करून त्यातील गाळ तात्काळ उचलण्याचे निर्देश दिले. नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर सातत्याने कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रस्ते व सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. राहिवासी भागांमधील अनधिकृत अतिक्रमण हटवून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, धोकादायक व वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून रस्ते व पादचारी मार्ग मोकळे ठेवण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या. केडिया नगर उद्यानाची पाहणी करताना उद्यान परिसर स्वच्छ, सुस्थितीत व नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात आला. नियमित देखभाल, पाणीपुरवठा व हरित क्षेत्र संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही दिले. दरम्यान, नाल्यामध्ये कचरा टाकताना एक नागरिक आढळून आल्याने अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक मॅडम यांच्या निर्देशानुसार संबंधित नागरिकावर तत्काळ ५०० रु. दंड आकारण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी प्रभागातील नगरसेवक प्रा. प्रशांत वानखडे, महेश मूलचंदानी, पद्मजा कौंडण्य, नंदा सावदे, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत डवरे, शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक पवन चावरे, मिथुन वाघमारे तसेच बिटप्यून, कोणार्क कंपनीचे सुपरवायझर उपस्थित होते. शहरात ज्याप्रमाणे स्वच्छतेबाबत आगडोंब उसळला असून शहर स्वच्छता नियमितपणे करण्याची आवश्यकता असल्यावर जोर दिला जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रस्ते, चौकांमधील अतिक्रमणही अनियंत्रितपणे वाढले आहे. त्यावर अतिक्रमण विभागाने नियंत्रण आणण्यासोबतच शहरातील विविध उद्यानांची स्थितीही वाईट आहे. त्या उद्यांना सुस्थितीत आणले तर उन्हाळ्याची सायंकाळ शहरवासीयांसाठी रम्य होईल. कारण, उन्हाळ्यातच मुले, ज्येष्ठ नागरिक हे उद्यानात फिरण्यासाठी जात असतात. परंतु, उद्यानांची स्थिती शहरात फारकाही चांगली नाही. उद्यानं मोडकळीस आली असून येथील झाडांचीही निगा राखण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed