सीईओ संजीता महापात्र यांनी धामणगाव रेल्वे येथे ऐकल्या तक्रारी:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार तक्रार निवारण शिबिराचे आयोजन




अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी धामणगाव रेल्वे पंचायत समितीत नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या तक्रारी दोन आठवड्यांत निकाली काढण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करावे, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समिती (DPC) बैठकीत दिले होते. त्यानुसार, सीईओ महापात्र यांनी संपूर्ण आठवडाभराचा कृती कार्यक्रम निश्चित केला असून, त्याचा शुभारंभ आज धामणगाव रेल्वे येथून करण्यात आला. सीईओ संजीता महापात्र यांनी धामणगाव रेल्वे पंचायत समितीच्या सभागृहात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी घराजवळील अतिक्रमण, घरकुलासारख्या वैयक्तिक समस्यांसह गायरान जमिनीचा गैरवापर यांसारख्या सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवरही तक्रारी मांडल्या. सीईओ येणार असल्याची माहिती ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांमार्फत तालुक्यात आधीच पोहोचवण्यात आली होती. त्यामुळे कामनापूर घुसळी, बोरगाव धांदे, देवगाव आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापात्र यांनी त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांच्या समक्ष नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि दोन आठवड्यांत ते सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी धामणगाव रेल्वेचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे आणि पंचायत समिती स्तरावरील इतर अधिकारी उपस्थित होते. जनता दरबार आटोपल्यानंतर, सीईओ महापात्र यांनी अधिकाऱ्यांकडून विविध विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कावली वसाड आणि ढाकुळगाव येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. तालुकास्तरावरील जनता दरबारचा आजचा शुभारंभ झाल्यानंतर, पुढील आठवड्यात मोर्शी, धारणी, चिखलदरा तसेच अमरावती पंचायत समिती स्तरावर जन तक्रार निवारण दिन आयोजित केला जाणार आहे. यासाठीचे दिवस निश्चित करण्यात आले असून, ते संबंधित पंचायत समिती प्रशासनामार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *