संभाजीनगरमध्ये 40 चार्जिंग स्टेशन; 100 स्टेशनची मनपाची घोषणा फोल:ईव्हींची विक्री 4 वर्षांत 107% वाढली, मात्र 881 वाहनांमागे केवळ एकच चार्जिंग स्टेशन

0
new-project-2026-05-10t100615376_1778387822.jpg




छत्रपती संभाजीनगर शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) क्रेझ झपाट्याने वाढत आहे, गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ईव्ही वाहनांच्या संख्येत तब्बल 107 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, एकीकडे वाहनांची संख्या सुसाट वेगाने वाढत असताना, दुसरीकडे चार्जिंग सुविधांच्या बाबतीत मात्र शहर अद्याप ‘स्लो ट्रॅक’वरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरात 2022-23 मध्ये 5,435 ईव्ही विक्रीची नोंद झाली होती, तर 2025-26 मध्ये विक्री 11,258 वर पोहोचली असून, या कालावधीत एकूण 5,823 वाहनांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढ आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ईव्हींची मागणी वाढत आहे. सध्या डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी वाहनांच्या तुलनेत ईव्ही खरेदीचे प्रमाण सुमारे 10 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. शहरात आतापर्यंत 35,270 ईव्ही वाहनांची नोंद करण्यात आली असल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात आहे. प्रत्येक वाहनांसोबत चार्जिंगची सुविधा देण्यात आली असली तरी सार्वजनिक चार्जिंग स्टेशनची संख्या अत्यंत कमी आहे. शहरात ईव्हींसाठी केवळ 40 चार्जिंग स्टेशन आहेत. 881 वाहनांमागे एक चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहे. शहरामध्ये 100 चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी केली होती, मात्र 3 वर्षांनंतरही ही घोषणा कागदावरच आहे. 2027 ला 25 टक्के वाढ छत्रपती संभाजीनगर शहरात ईव्ही वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्या डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी वाहनांच्या तुलनेत ईव्हींची विक्री सुमारे 10 टक्के आहे. मात्र, पुढील वर्षी ही टक्केवारी वाढून 25 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कंपन्यांकडून वाहनांची रेंज वाढवण्यावर भर दिला जात असून 700 ते 1,000 किमी रेंजची वाहनेही लवकरच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. – संजय जोशी, अभ्यासक, ईव्ही वाहन मनपाचे दुर्लक्ष महापालिकेने दोन वर्षांपूर्वी शहरात 100 चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा केली होती. त्याचा पाठपुरावा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले नाहीत. प्रत्येक उड्डाणपुलाखाली चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली होती. मात्र, मनपाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. – सुजित जैन, ईव्ही पंप सर्व्हिस 40स्टेशनला परवानगी 40 चार्जिंग स्टेशनना महावितरण विभागाने परवानगी दिली आहे. यामध्ये लघुदाब स्टेशन 37 असून याची क्षमता प्रति 70 किलोवॅटपर्यंत आहे, तर 3 उच्चदाब स्टेशनची क्षमता 1,000 किलोवॅट, 2,200 किलोवॅट आणि 120 किलोवॅट क्षमतेची स्टेशन आहेत. सर्वाधिक दुचाकी विक्री संभाजीनगर शहरात मागील 5 वर्षांत दुचाकी तसेच चारचाकी अशा एकूण 35,270 ईव्ही वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये दुचाकी वाहनांचा सर्वाधिक 30,199 वाटा आहे. ईव्ही विक्रीमध्ये दुचाकीनंतर तीनचाकी व त्यानंतर चारचाकींचा नंबर लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed