44 पैकी 41पोलिस चौक्या बंद; तीनच्या भरवशावर छत्रपती संभाजीनगरची सुरक्षा:‘दिव्य मराठी’च्या पाहणीत वास्तव उघड; अधिकारी म्हणतात, इतर बंदोबस्तात कर्मचारी

0
new-project-2026-05-10t101147007_1778388356.jpg




छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वर जात आहे. चोऱ्या, लूटमार आणि गोळीबाराच्या घटना घडत आहेत. एकीकडे पोलिस प्रशासन गस्त सुरू असल्याच्या वल्गना करत असताना, ‘दिव्य मराठी’ने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये भलतेच वास्तव समोर आले. नागरिकांच्या तातडीच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या शहरातील 44 पैकी तब्बल 41 पोलिस चौक्या चक्क कुलूपबंद असल्याचे दिसून आले. “साहेब, या बंद चौक्यांच्या दारावर डोके फोडून जनतेने दाद मागायची का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. शहर आयुक्तालय हद्दीत एकूण 44 पोलिस चौक्या मंजूर आहेत. या चौक्यांच्या कार्यान्वयनासाठी 55 अधिकारी आणि 178 कर्मचारी असा एकूण 233 जणांचा ताफा तैनात असल्याचा दावा कागदोपत्री केला जातो. ‘दिव्य मराठी’ने विविध वेळांत शहराचा फेरफटका मारला असता, केवळ घाटी, टीव्ही सेंटर आणि संताजी पोलिस चौकी या तीनच चौक्या सुरू आढळल्या. उर्वरित सर्व चौक्यांना टाळे होते आणि त्या ठिकाणी पोलिसांऐवजी मोकाट कुत्र्यांचा वावर दिसून आला. हेच का तुमचे स्मार्ट पोलिसिंग? रात्री-अपरात्री अपघात झाला किंवा महिलांची छेडछाड झाली, तर मदतीसाठी कुणाकडे धावायचे? भरदिवसा चौक्यांच्या दारात कुत्र्यांचे साम्राज्य असेल, तर सामान्यांनी सुरक्षा कुणाकडून अपेक्षित ठेवायची? पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे शहराच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कागदोपत्री ऑन ड्युटी, वास्तवात नॉट रिचेबल अनेक कर्मचारी चौक्यांवर नियुक्त असून त्यांना राजकीय नेत्यांच्या बंगल्यावर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑर्डरली कामासाठी किंवा महत्त्वाच्या विभागांत अटॅच केले जाते. तसेच, पेट्रोलिंगच्या नावाखाली गाड्या एकाच ठिकाणी उभ्या करून इंधन वाचवले जाते. परिणामी, बंद असलेल्या पोलिस चौक्यांचा वापर आता फक्त जप्त केलेल्या जुन्या सायकली, दुचाकी किंवा कचरा ठेवण्यासाठीचे गोडावून आहेत. शहरातील बंद पोलिस चौक्यांच्या दुरुस्तीचा सविस्तर अहवाल आम्ही वरिष्ठांकडे पाठवला आहे, सध्या शहर पोलिस दलात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. शिवाय, शहरात सातत्याने व्हीआयपी दौरे आणि बंदोबस्त असतात. उपलब्ध पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठवावे लागते. त्यामुळे चौक्यांवर पूर्णवेळ कर्मचारी तैनात करण्यात अडचणी येत आहेत. परंतु आमचे बीट अंमलदार नेहमी कार्यरत आहेत. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपायुक्त. दिव्य मराठीच्या ग्राउंड रिपोर्टमधील 3 ज्वलंत प्रश्न 1 चौक्या नावापुरत्या: मॉर्निंग आणि नाइट पेट्रोलिंग सुरू आहे, असे सांगितले जाते, परंतु 44 चौक्या नावापुरत्या उरल्या आहेत. शहराचा डोलारा फक्त 3 सुरू असलेल्या चौक्यांवरच टिकून आहे का?
2 गुन्हेगारांना ‘ग्रीन सिग्नल’: चौक्यांना कुलूप आणि रस्ते निर्मनुष्य असल्याने रात्रीच्या वेळी टवाळखोर, मद्यपी आणि चोरांचे फावतेय. गुन्हेगारांनी आता थेट गोळीबारापर्यंत मजल मारली आहे.
3 कर्मचारी नेमके आहेत कुठे?: कागदोपत्री नियुक्त असलेले 233 जण नेमके कोणत्या ड्युटीवर आहेत? त्यांची हजेरी घरबसल्या लागते की ते केवळ कागदावरच हजर आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed