![]()
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह मंत्री विमान प्रवासाची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून, अनेक मंत्री हवाई मार्गाचा वापर करून दौरे पूर्ण करत आहेत. याच प्रचाराच्या धावपळीत तांत्रिक कारणामुळे राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर येथील हवाई उड्डाण रद्द करण्यात आले. ‘एव्होसेट एव्हिएशन’ कंपनीच्या सहा आसनी विमानाने साडेचार वाजता उड्डाण करणे अपेक्षित होते, मात्र हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथील हवाई यंत्रणांकडून आवश्यक ‘क्लिअरन्स’ मिळण्यास विलंब झाला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही परवानगी न मिळाल्याने, सुरक्षिततेच्या कारणास्तव वैमानिकाने विमान उड्डाणास असमर्थता दर्शवली. लातूर विमानतळावर रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक यंत्रणा उपलब्ध नसल्याने या अडचणीत अधिकच भर पडली. अखेर हवाई उड्डाण शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे विमान उड्डाण अधिकृतपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान उपलब्ध होऊ न शकल्यामुळे आपला परतीचा प्रवास रस्तेमार्गाने कारने करावा लागला. त्यानुसार गुलाबराव पाटील चारचाकी वाहनातून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांचे लातूर दौऱ्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याचे समोर आले होते. टेकऑफ करण्यापूर्वीच पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी सकाळी साडे दहा वाजता निघार होते. त्यासाठी हेलिकॉप्टर विमानतळावरून टेकऑफ करणार होते. मात्र मला कळवण्यात आले मी जे काल हेलिकॉप्टर वापरले होते त्यात काही बिघाड आहे. मला कालही तसे वाटले होते. हे हेलिकॉप्टर जुने आहे. पण काय बिघाड आहे या टेक्निकल बाबतीत मी गेले नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले होते. पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, जेव्हापासून अजितदादांचा अपघात झाला आहे आणि त्यांचे निधन झाले आहे. मी विचार करते की त्यावेळी त्या विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना आणि भय त्यांनी अनुभवले असेल, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली होती.
मंत्री गुलाबराव पाटलांचे हवाई उड्डाण रद्द:आवश्यक क्लिअरन्स मिळण्यास विलंब; लातूरहून संभाजीनगरकडे रस्ते मार्गाने प्रस्थान
