.

तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध सेवा व योजनांसाठी स्वतंत्र कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासू नये, यासाठी अत्याधुनिक आणि सर्वसुविधायुक्त कृषी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व अधिनस्त दोन मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांसाठी कृषी विभागाच्या मालकीच्या जागेवर या इमारतीचे बांधकाम होणार आहे. प्रकल्पाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली असून, त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
येथील प्रक्षेत्रावरील गट क्रमांक ११६ मध्ये कृषी भवन उभारण्यात येणार आहे. या परिसरात कृषी चिकित्सालय व फळरोपवाटिकाही विकसित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शनासोबत दर्जेदार रोपे व विविध कृषी सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार १४१९.९८ लाख रुपयांच्या किंमतीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या पत्रानुसार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी ११२१.५८ लाख रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली असून निविदा किंमत ९३२.०० लाख रुपये आहे.
या प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र १९४७.१० चौ. मी. असून इमारत दोन मजली असेल. तळमजल्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कर्मचारी कक्ष, महिला कक्ष, पॅन्ट्री, स्टोर रूम, कृषी मंडळ अधिकारी कार्यालय, प्रसाधनगृहे व मीटिंग हॉल असतील. पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय, कर्मचारी कक्ष, दोन कृषी मंडळ अधिकारी कार्यालये, पॅन्ट्री, स्टोर रूम व प्रसाधनगृहे असतील.
^कळवण तालुका कृषी क्षेत्रात प्रयोगशील असून येथील शेतकरी नवनवीन यंत्रसामुग्री व तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. कृषी भवनामुळे शासनाच्या योजनांची माहिती व मदत एकाच ठिकाणी मिळेल. त्यामुळे हे भवन शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरेल. – शैलेश पवार, माजी कृषी सभापती, जि. प. नाशिक
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad