अमरावतीत रविवारपासून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा:श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर होणार उद्घाटन




संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारपासून (१ फेब्रुवारी) ते ५ फेब्रुवारीपर्यंत अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज दुपारी ४ वाजता पार पडेल. कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख स्पर्धेचे उद्घाटन करतील. यावेळी पोलिस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघही घोषित करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय महाविद्यालय, अमरावतीचे ऋत्विक कुडवे, रोहीत सहारे व आकाश सोळंके; श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगांव सुर्जीचे ओम सोळंके व दिपेश वानखडे; श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचे रोहण शेळके व रोहण पोटे; ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा अनिकेत चोरे; युवाशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा करण सुपेकर; शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचे रोहण थोपडे, अंशुमन डोकरे व निलेश कोचे; तसेच श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे प्रथमेश थोरकर व अजय मळेकर यांचा समावेश आहे. याशिवाय, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचे भाकित मेश्राम, कुणाल लोणारे, रोहीत मेश्राम व यश विरुळकर; भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय, बाभुळगावचा सर्वेश इंझळकर; रामक्रिष्ण महाविद्यालय, दर्यापूरचा प्रशिक गवई आणि श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा मोहीत भिसे यांचाही चमूत समावेश आहे. निवड झालेल्या चमूचे सराव शिबीर याच मैदानावर पार पडले असून, स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा हा अमरावतीसाठी पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी येथे विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु एवढी मोठी स्पर्धा प्रथमच होत आहे. सलग १० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील ऐंशीहून अधिक संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक व अधिकारी अथक प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *