भाजपची बंगालनंतर आता महाराष्ट्रावर नजर:SIR वर लक्ष केंद्रित; मराठी मुलूख जिंकण्यासाठी सर्व लहानथोर कार्यकर्त्यांना देणार प्रशिक्षण

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-04t12_1778064960.png




पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. भाजपने बंगालमध्ये एसआयरच्या जोरावर विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे. आता हीच रणनीती भाजप महाराष्ट्रात राबवण्याची शक्यता आहे. यासाठी मराठी मुलूखावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने आपल्या सर्वच स्तरांवरील कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा मागील 15 वर्षांपासून पश्चिम बंगालचा गड सर करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यात त्यांना यंदा ऐतिहासिक यश मिळाले. भाजपच्या या यशात साम-दाम-दंड-भेद असे सर्वच घटक कारणीभूत ठरले. पण निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेचा भाजपला बंगालमध्ये मोठा फायदा झाला. आता भाजप महाराष्ट्रातही हाच कित्ता गिरवणार आहे. भाजपने आज दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत एसआयआरच्या मुद्यावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्वच लहानथोर नेत्यांना मिळणार प्रशिक्षण प्रस्तुत कार्यशाळेत भाजपने एसआयआरच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी एक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात नेत्यांकडून भाजप पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. पदाधिकारी प्रशिक्षणानंतर भाजप आपल्या लोकप्रतिनिधींनाही प्रशिक्षण देणार आहे. पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विभागीय पातळीवर प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्याने आमदार, खासदार व मंत्र्यांना एसआयआर मोहिमेसाठी प्रशिक्षित केले जाईल. अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी आमदार व खासदारांना मार्गदर्शन करतील. भाजपच्या या खास मोहिमेचा 2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. विशेषतः या घटनाक्रमामुळे भाजप 2029 च्या निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार काय? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. अमित शहांनी गतवर्षी दिले होते स्वबळाचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गतवर्षी महाराष्ट्रात भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नसल्याचे सूचक विधान केले होते. तेव्हापासून राज्यात भाजप 2029 ची निवडणूक आपल्या मित्रपक्षांना बाजूला सारून स्वबळावर लढणार काय? अशी चर्चा सुरू झाली होती. अमित शहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकताना म्हणाले होते, भाजप आता कुणाच्या कुबड्या घेऊन चालणारा पक्ष नाही. हा स्वबळावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आता डबल इंजिन सरकार नको, तर ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. आगामी निवडणुकीत असे लढा की, विरोधकांचा सुपडासाफ झाला पाहिजे. विरोधक दुर्बिण लावूनही सापडता कामा नये. भाजपत बुथ प्रमुख हा पक्षाचा, देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीवर चालत नाही. ज्याच्यात क्षमता आहे, तोच या ठिकाणी मोठा नेता होतो. आम्ही हे सिद्ध केले आहे की, या देशात घराणेशाही चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावाच लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed