तेल खरेदीत नफ्याचे आमिष; महिलेची अडीच कोटींची फसवणूक:दुबईतील आरोपींसह नऊ जणांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल




कच्चे तेल खरेदीत चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी दुबईत वास्तव्य करणाऱ्या तिघांसह एकूण नऊ जणांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३६ वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पूनम विशाल शेळके, विनायक महादेव शेळके, सुरेखा महादेव शेळके (तिघे रा. दुबई), वैशाली हनुमंत फडतरे (वय ४९, रा. आंबेगाव बुद्रुक), हनुमंत लक्ष्मण फडतरे, रितिका हनुमंत फडतरे, ऐश्वर्या ओंकार लोंढे, तसेच अल्फा माईंड सोल्यूशन्स आणि इन्फोसेस सोल्यूशन्स या कंपन्यांच्या संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना बाणेर भागातील कार्यालयात बोलावून घेतले आणि कच्चे तेल खरेदी-विक्रीत पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. इतरांना अल्पावधीत कशाप्रकारे गुंतवणुकीवर फायदा मिळत आहे हे दाखवून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून महिलेने वेळोवेळी आरोपींना २ कोटी ५४ लाख ८४ हजार रुपये दिले. मात्र, गुंतवणूक केल्यानंतर आरोपींनी महिलेला कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली.बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *