जि.प. अधिकारी, कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ:तीन हजार अधिकारी, शिक्षकांचा सहभाग; 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार




अमरावती जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला शनिवार, ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या हस्ते कबड्डीच्या क्रीडांगणाचे पूजन करून महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. हा महोत्सव आगामी २ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये १५ संघांमधील सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळी अतिरिक्त सीईओ श्रीराम कुळकर्णी, बीडीओ विनोद खेडकर, गुणवंत वरघट, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुगल, नितिन उंडे यांच्यासह सर्व समित्यांचे प्रमुख उपस्थित होते. महोत्सवातील विजेत्या संघांना २ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा परिषद कन्या शाळा कॅम्प, अमरावती (गर्ल्स हायस्कूल) येथे बक्षीस वितरण केले जाईल. पुरुष क्रिकेट वगळता सर्व सांघिक स्पर्धांचे आयोजन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे करण्यात आले आहे. कबड्डीचे सर्व सामने पारंपरिक पद्धतीने मातीच्या मैदानावर खेळवले जात आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह येथे सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत होणार आहे. ही माहिती क्रीडा संयोजक डॉ. नितिन उंडे, प्रसिद्धी समितीचे प्रमुख विनोद गाडे, विनायक लकडे, राजेश सावरकर आणि पुनम उके यांनी दिली. या महोत्सवात विविध सांघिक खेळांचा समावेश आहे. यामध्ये क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल पासिंग, व्हॉलीबॉल स्ट्रोक्स, फुटबॉल, बॅडमिंटन एकेरी, बॅडमिंटन दुहेरी, ४५ वर्षांवरील बॅडमिंटन एकेरी व दुहेरी, टेबल टेनिस एकेरी व दुहेरी, टेनिक्वॉईट एकेरी व दुहेरी, कॅरम एकेरी व दुहेरी या स्पर्धांचा समावेश आहे. तसेच, वैयक्तिक स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, १५०० मीटर धावणे, ४५ वर्षांवरील १०० मीटर व १५०० मीटर धावणे, रिले रेस ४x१००, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, ५० मीटर व १०० मीटर स्विमिंग, ४५ वर्षांवरील ५० मीटर व १०० मीटर स्विमिंग आणि बुद्धिबळ या खेळांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *