![]()
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत भावूक अंतःकरणाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे हे मोठे नुकसान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा निव्वळ एक अपघात असून यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट करतानाच, शरद पवार यांना शोक अनावर झाल्याने बोलणेही कठीण झाले होते. खरे तर आज मी प्रसारमाध्यमांसमोर येणार नव्हतो, असे नमूद करत त्यांनी आपल्या पुतण्याला गमावल्याचे दुःख अत्यंत जड अंतःकरणाने व्यक्त केले. प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू आहे. त्याचा महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात आहे. यामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. मात्र, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करून इथे राजकारण आणू नये, असे पवारांनी म्हटले आहे. अपघाताची चौकशी करण्यात यावी – संजय राऊत आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काळा दिवस आहे. अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम आणि रोखठोक नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण आता ‘बेचव’ आणि ‘आळणी’ होईल. त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच राहिले, अशा अत्यंत भावूक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. शोक व्यक्त करतानाच संजय राऊत यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. विमान अपघाताची चौकशी करणार – एकनाथ शिंदे तर अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. डोंगरा एवढं दुःख आहे. महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. या विमान अपघाताची चौकशी करणार आहोत. आमच्या सहकाऱ्याचा जीव गेला आहे. त्यामुळे नक्कीच विमान अपघाताची चौकशी होणार. असे अपघात पुन्हा होता कामा नये म्हणून चौकशी करणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान:हा केवळ अपघात, यात कोणतेही राजकारण नाही; शरद पवारांची प्रतिक्रिया
