27 नगरसेवकांच्या कुणबी जात प्रमाणपत्रांवर तक्रार:पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ओबीसी आरक्षणाचा गैरवापर झाल्याचा आरोप




पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील २७ नगरसेवकांच्या कुणबी (ओबीसी) जात प्रमाणपत्रांवर ओबीसी नेते मृणाल ढोलेपाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याबाबत तक्रार दाखल केली असून, संबंधित नगरसेवकांनी ओबीसी आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. ढोलेपाटील यांच्या म्हणण्यानुसार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी ओबीसी आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, मराठा समाजातील काही उमेदवार निवडणुकीत स्वतःला ‘कुणबी’ दाखवून आरक्षित जागांवर निवडून येत आहेत. ही आरक्षणाची चोरी असून, यामुळे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुणे महानगरपालिकेत एकूण १६५ जागांपैकी ४४ जागा ओबीसींसाठी राखीव आहेत. यापैकी २६ जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी ‘कुणबी’ म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला असल्याचा आरोप आहे. यात भाजपचे १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक असल्याचा उल्लेख आहे. यामुळे ६० टक्क्यांहून अधिक ओबीसी आरक्षित जागांवर मूळ ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचा दावा ढोलेपाटील यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही अशीच स्थिती असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. येथील १२५ पैकी ३४ जागा ओबीसींसाठी राखीव आहेत. त्यापैकी २६ जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी ‘कुणबी’ दाखवून विजय मिळवला आहे. यात भाजपचे १७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आणि शिवसेना (शिंदे गट) चे २ नगरसेवक असल्याचे नमूद आहे. यामुळे सुमारे ७६ टक्के ओबीसी प्रतिनिधित्व हिरावले गेल्याचे ढोलेपाटील यांनी म्हटले आहे. ढोलेपाटील यांनी तक्रारीत संबंधित नगरसेवकांची नावे नमूद केली असून, वैयक्तिक सुनावणीची मागणी केली आहे. तसेच, सतर्कता कक्षाचा अहवाल आणि इतर संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र जात प्रमाणपत्र कायदा २००० आणि नियम २०१२ चे उल्लंघन करून खोटी प्रमाणपत्रे मिळवली जात असल्याचा आरोप करत, खऱ्या ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *