![]()
संपूर्ण देशभर 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बिनागुंडा या अतिदुर्गम भागात आज एक ऐतिहासिक सुवर्णक्षण साजरा झाला. एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अधिकृतपणे तिरंगा फडकवण्यात आला. 26 जानेवारी 1950 पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू होऊन जनतेचे राज्य आले असले, तरी या दुर्गम भागातील आजच्या पहिल्या ध्वजारोहणामुळे हा परिसर आता खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्याचे दिसत असून, नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गडचिरोली पोलिस दलाने माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात दोन दिवसांपूर्वीच नवीन पोलिस ठाणे उभारून दशकानुदशके चाललेली नक्षलवाद्यांची दहशत मोडीत काढली आहे. घनदाट जंगले आणि डोंगराळ भागामुळे दुर्गम असलेल्या अबुजमाड परिसरातील बिनागुंडा येथे माओवाद्यांच्या अस्तित्वाचे आणि दहशतीचे प्रतीक असलेले त्यांचे स्मारक पोलिसांनी पूर्णपणे नष्ट केले. या धाडसी कारवाईमुळे ग्रामस्थांच्या मनातील मानसिक भीती दूर झाली असून, या भागात प्रथमच लोकशाहीचे प्रतीक असलेला तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक दिवशी केवळ बिनागुंडाच नव्हे, तर सीमेवरील कवंडे, तूमरकोटी आणि फुलणार या अतिदुर्गम गावांतही सुरक्षा दलांच्या उपस्थितीत प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्यात सुरक्षा जवानांसोबत स्थानिक शाळकरी मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. चिमुकल्यांनी दिलेली भाषणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून, या भागात आता नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडून विकासाची आणि शिक्षणाची नवी पहाट उगवत असल्याचे आशादायी चित्र पाहायला मिळाले.
गडचिरोलीच्या नक्षल गडात पहिल्यांदाच फडकला तिरंगा!:बिनागुंडात ऐतिहासिक ध्वजारोहण, माओवाद्यांचे स्मारक नष्ट करून दहशत मोडीत
