पुण्यात स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शन, सैन्याचे सामर्थ्य अनुभवले:दगडूशेठ ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन दिवसीय आयोजन




पुण्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनातून पुणेकरांना भारतीय सैन्याचे सामर्थ्य अनुभवण्याची संधी मिळाली. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार व ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर, कर्नल बद्रीदत्त गनोला, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अजय मोझर, रुणाल केसरकर, अंकुश रासने यांसह लष्करातील माजी अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. या प्रदर्शनात स्नायपर एमके १, एयर डिफेन्स गन, अँटी मटेरियल रायफल (विध्वंसक), एके ४७ रायफल, एमएमजी गन, टियर गॅस गन यांसारखी विविध शस्त्रास्त्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. यासोबतच ड्रोन, आर्टिलरी अम्युनिशन, एरियल बॉम्ब, ग्रेनेड, लढाऊ विमानातील बॉम्ब, रॉकेटचे विविध प्रकार, तोफांकरीता लागणारा दारुगोळा, मल्टी बॅरेल लॉन्च सिस्टिम, बुलेटस्, हँड ग्रेनेड आणि अ‍ँटि सम्बरिन रॉकेट यांसारख्या युद्धसज्जतेसाठी आवश्यक साधनांची मॉडेल्सही ठेवण्यात आली आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, भारत सरकार रक्षा मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडने पुण्यात साकारलेली आणि भारतासह विविध देशांत निर्यात केली जाणारी भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे पुणेकरांना पाहण्याची संधी मिळत आहे. हे प्रदर्शन २६ जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत विनामूल्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनाच्या नियोजनात सैन्यदलातील जवान सहभागी असून, ते प्रत्येक शस्त्राविषयी तात्काळ माहिती देत आहेत. आत्मनिर्भर, बलशाली व विश्वगुरू भारत साकारण्याकरिता संपूर्ण देशात शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी पुण्यातील म्युनिशन्स इंडिया लिमिटेड कार्यरत आहे. त्यांच्या सहकार्यानेच या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांसह पुणेकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *