टिपर गोदावरी नदीत कोसळून सहायकाचा मृत्यू चालक बचावला
नांदेड़ (प्रतिनिधी)-आज सकाळी सुमारे ११:०० वाजण्याच्या दरम्यान गोदावरी नदीवरील केळी-मराठी पुलावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली. माळकवठा परिसरातून गिट्टी भरून जाणारा एक टिप्पर चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट नदीपात्रात कोसळला. या अपघातात टिपरच्या सहायकचा जिव गेला आहे. चालकाचा जीव थोडक्यात वाचला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली असून ही घटना परिसरासाठी धक्कादायक ठरली आहे.
घटनेची माहिती मिळताच मराठी गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जाधव पद्माकर, संतोष ढगे, बळी पाटील, तसेच सरपंच अवधूत ढगे यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे चालकाचा जीव वाचविण्यात यश आले; मात्र ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
मुदखेड तालुका व नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू-गिट्टी वाहतूक, टिप्पर, हायवा व ट्रॅक्टरद्वारे सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक आता नवीन राहिलेली नाही. दिवसाढवळ्या नियमांचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जाते. काही वाहने पकडली जात असली तरी महसूल विभागाकडून योग्य तपासणी न करता ती सोडून दिली जात असल्याचे गंभीर आरोप वारंवार समोर येत आहेत.
अशा प्रकारच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणा, अनियंत्रित वाहतूक आणि अवैध उत्खननामुळे आज एका युवकाचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाने वेळेत कठोर कारवाई केली असती तर अशी दुर्घटना घडली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.अवैध वाळू-गिट्टी माफियांवर तात्काळ कठोर कारवाई करून संबंधित अधिकारी व जबाबदार घटकांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा भविष्यात आणखी मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.