सिने अभिनेता कपिल गुडसुरकरांच्या दिलखुलास संवादामुळे तरुणाईला प्रेरणा
नांदेड – सूर्यमुद्रा फाऊंडेशन आणि आई क्रिएशन्स,नांदेड आयोजित ‘ अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या पाचव्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ भोंगा ‘ चित्रपटाचे नायक कपिल कांबळे गुडसुरकर ह्यांनी ‘ अभिनय : एक मुक्त संवाद ‘ ह्या विषयावर बोलताना ‘ कलावंत म्हणून यशस्वी होण्यासाठी आधी माणूस म्हणून यशस्वी व्हा म्हणजे तुमची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही.पण,तुम्ही स्वतः जर शॉर्ट कट शोधू लागलात, अहंकाराने वागू लागलात तर तुमची अधोगती कुणीही रोखू शकणार नाही.’ अशा शब्दात नवोदितांना सल्ला दिला.
महाप्रजापती माता गौतमी बुद्ध विहार सभागृह, श्रावस्तीनगर येथे संपन्न झालेल्या आजच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी सामाजिक,सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामचंद्र वनंजे हे होते.
प्रारंभी शिबीरार्थीच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.साहित्यिक अरविंद गवळे ह्यांनी कपिल गुडसुरकर ह्यांचा परिचय करून दिला.
शिबिराचे मुख्य संयोजक डॉ. विलासराज भद्रे ह्यांनी आपल्या प्रास्ताविकात आई क्रिएशन्सच्या ३ दशकांच्या नाट्य चळवळीवर प्रकाश टाकला.ह्या सत्रात शिबिरातील अनेक कलावंतांनी चित्रपट क्षेत्राबद्दल अनेक प्रश्न विचारले. गुडसुरकर ह्यांनी त्यांचा एक उनाड मुलगा ते यशस्वी अभिनेता हा त्यांचा प्रवास,त्यातील संघर्ष सांगितला तेंव्हा ऐकून सगळे रोमांचित झाले.
याप्रसंगी आई क्रिएशन्सच्या सुप्रसिध्द सिने अभिनेत्री माया कांबळे आणि सुप्रसिध्द अभिनेते आणि गायक बी.के.कांबळे ह्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण ज्यांच्या नावाने सुरू झाले ते समाजासाठी आपले सर्वस्व समर्पित करणारे प्राचार्य अमृतराव भद्रे ह्यांचा अलौकिक आणि प्रेरक जीवन प्रवास माहितीपटाच्या माध्यमातून तयार करण्याचा आग्रह त्यांनी डॉ.भद्रे ह्यांना केला.
आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ.रामचंद्र वनंजे ह्यांनी ‘ ज्या ज्या वेळी देशावर कुठले प्रतिगामी संकट येते तेंव्हा डॉ.भद्रे ह्यांची वाणी आणि लेखणी पेटून उठते.आणि अन्यायाविरुध्द ती केवळ प्रश्न विचारत नाही तर पर्याय देत असते ‘ असे गौरवोद्गार काढले.नि लाक्षी नेत्रगावकर ह्यांनी शिबिराबद्दल भावपूर्ण अनुभव सांगत आभार मानले.आजच्या सत्राला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.