जिल्ह्यातून हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

नांदेड (जिमाका) –  सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात मुदखेड व मुखेड वगळता उर्वरित १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे चारा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात उपलब्ध असलेला हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर विक्री व वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश, २००१ मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चाऱ्याचे संरक्षण करून संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुपालकांना चारा उपलब्ध राहावा, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश २९ सप्टेंबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार आहे.


Post Views: 21










Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *