शासनाच्या धोरणाचा निषेध:चांदवडला दुष्काळी यादीतून वगळल्याने‎ तहसीलदारांना करपलेली पिके देत ठिय्या‎



दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या ‘ट्रिगर-१’ यादीतून चांदवडला वगळल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. या अन्यायाविरोधात सोमवारी सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना व शेकडो बळीराजांनी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांना करपलेली पिके आणि ‘गाजर’ देत रोष व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही व शेजारील तालुक्यांचा समावेश झालेला असताना, कायमस्वरूपी दुष्काळाच्या छायेत असलेल्या चांदवडवरच हा अन्याय का, असा सवाल आंदोलकांनी केला. तहसीलदारांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली व प्रवेशद्वारावर करपलेली पिके फेकून निषेध नोंदवला. आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), मनसे, माकप, वंचित बहुजन आघाडी व निर्भय महाराष्ट्र पार्टी यांसह डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, विलास भवर, संजय जाधव, विजय जाधव, ॲड. दत्तात्रय गांगुर्डे, नितीन थोरे, हनुमंत गुंजाळ, संतोष केदारे सहभागी झाले होते. चांदवड | तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, शेतपिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाची आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी तालुक्यातील कातरवाडी येथील भागवत झाल्टे यांनी सोमवारी सकाळी वडगाव पंगू येथील २०० फूट उंच टॉवरवर चढून अन्नत्याग आंदोलन केले. तहसीलदारांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर थेट संवादानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्यांवर पाच दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थीती किंवा दुष्काळ घोषीत करण्यासाठी सलग २१ दिवस किंवा त्याहून अधिक काळ पावसाचा खंड पडणे हा मुख्य निकष मानला जातो. नियमानुसार, एखाद्या भागात पावसाची एकूण तूट २५% पेक्षा जास्त असते आणि सलग ३ आठवडे पाऊस पडत नाही, तेव्हा तेथे दुष्काळाचा ट्रिगर-१ लागू केला जातो. {जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात सरासरी पावसाच्या २०% पेक्षा अधिक तूट असला तर त्या तालुक्याचा समावेश ट्रिगर-१ मध्ये केला जातो. { चांदवड तालुक्यात जुलै महिन्यात पाऊस झाला असला तरी तालुक्यातील ८ मंडळांपैकी चांदवड, वडनेरभैरव, वडाळीभोई, धोडंबे, शिंगवे या पाच मंडळांत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. तालुक्याची तूट ६.७९ अशी नोंद झालेली आहे. {चांदवड तालुक्यातील काही मंडळांत काही दिवसांत ०.१ मिमी ते ०.८ मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली आहे. तर काही दिवसांत ५ मि.मी.च्या आत नोंद झाली आहे. त्यामुळे नगन्य पाऊस होऊनही सलग पावसाचा खंड दिसून येत नाही. अन्यथा चक्काजाम आंदोलन आठ दिवसांत चांदवड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *