![]()
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत सुमारे 62.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेत प्रामुख्याने 40 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची देशी दारू पकडण्यात आली. विशेष म्हणजे, ही दारू गोव्यात तयार करण्यात आली होती, मात्र त्यावर महाराष्ट्राचे बनावट लेबल लावून ती विक्रीसाठी आणली जात होती. निवडणुकीच्या काळात छुप्या मार्गाने होणारी ही मोठी तस्करी प्रशासनाने उघडकीस आणली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कागल पथकाने देवगड-निपाणी राज्य महामार्गावरील बसवडे फाटा येथे सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या ट्रकची (क्रमांक MH-40-CM-2535) झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये अत्यंत चलाखीने पुढच्या बाजूला देशी दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते, तर मागील बाजूस पोलिसांची नजर चुकवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे बॉक्स रचून ठेवल्याचे आढळून आले. ही यशस्वी कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक शंकर सीताराम आंबेकर आणि कोल्हापूर भरारी पथक क्रमांक 2 चे निरीक्षक प्रमोद खरत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात दुय्यम निरीक्षक ए. आर. नायकुडे, पी. डी. नागरगोजे, डी. बी. गवळी, सचिन काळेल, लक्ष्मण येडगे, केतन दराडे तसेच गडहिंग्लज विभाग आणि भरारी पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 62,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त तपासणी दरम्यान पथकाला ‘रॉकेट देशी दारू’ या ब्रँडचे एकूण 1,000 बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 90 मिली क्षमतेच्या 100 बाटल्या, याप्रमाणे एकूण 1 लाख बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या बाटल्यांवर अहमदनगरमधील ‘प्रकार डिस्टिलरी’ असा बनावट लेबल लावण्यात आला असला, तरी ही दारू मुळात गोवा राज्यात तयार करण्यात आली असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या संपूर्ण कारवाईत दारूसाठा, 20 लाख रुपये किमतीचा ट्रक, पाण्याचे बॉक्स आणि मोबाईल फोन असा एकूण 62,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रक चालक सलीम खयूम शेख (रा. आदिलाबाद, तेलंगणा) आणि क्लिनर सूरज तेजराव सावंत (रा. यवतमाळ) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949, भारतीय न्याय संहिता 2023 आणि ट्रेड मार्क ॲक्ट 1999 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात छुप्या मार्गाने आणि बनावट लेबलचा आधार घेऊन चालणाऱ्या या तस्करीचा पर्दाफाश झाल्याने खळबळ माजली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
गोव्याची दारू, महाराष्ट्राचे लेबल!:कोल्हापुरात 62 लाखांची बेकायदेशीर दारू पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
